
सोसायट्यांच्या प्रश्नांसंदर्भात ‘सहकार दरबार’
पिंपरी, ता. ३ ः गृहनिर्माण सोसायटीचे कन्व्हेयन्स राहिलंय. त्याबाबत काही शंका आहेत. सोसायटीच्या निवडणुकीसंदर्भात शंका आहे. पुनर्विकास करायचा आहे. पाणी, वीज, रस्ते याबाबतचे प्रश्न आहेत. त्या सोडवायच्या आहेत. तर, त्यासाठी येत्या शनिवारी संधी आहे. कारण, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघाच्या पिंपळे सौदागर शाखेने शनिवारी (ता. ७) सुवर्ण महोत्सवी सहकार दरबार आयोजित केला आहे, अशी माहिती संयोजक चारुहास कुलकर्णी यांनी दिली.
सहकारी गृहनिर्माण संस्थांना मार्गदर्शन करण्यासाठी पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स महासंघातर्फे दरमहा पहिल्या शनिवारी पिंपळे सौदागर येथे ‘सहकार दरबार’ आयोजित केला जातो. आता महासंघाने अपार्टमेंट्स कॉन्डोमिनियम देखील आपल्या कार्यकक्षेत जोडले आहेत. महासंघाच्या पिंपळे सौदागर येथील विभागीय कार्यालयाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात ४९ सहकार दरबार झाले आहेत. सुवर्ण महोत्सवी सहकार दरबार शनिवारी अर्थात सात मे रोजी आयोजित केला आहे. त्याला सहकार आयुक्त अनिल कवडे, जिल्हा उपनिबंधक नारायण आघाव, पिंपरी-चिंचवड क्षेत्राचे उपनिबंधक नवनाथ अनपट यांच्यासह महापालिका, महावितरण व स्मार्ट सिटीचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट कॉन्डोमिनियमसाठी संबंधित विभागांच्या सर्वोच्च अधिकाऱ्यांकडून थेट त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याची ही एक नामी संधी आहे. त्यामुळे सर्व सहकारी गृहनिर्माण संस्था आणि अपार्टमेंट्स यांनी सहकार दरबारात उपस्थित राहावे, असे आवाहन कुलकर्णी यांनी केले आहे.
आपले प्रश्न आधी कळवा
- कन्व्हेयन्स, इलेक्शन्स, रिकव्हरी, मीटिंग्ज, रिडेव्हलपमेंट इत्यादीसारख्या सोसायटी किंवा अपार्टमेंट्सच्या व्यवस्थापनाशी संबंधित प्रश्न ः स्वतःचे व सोसायटी वा अपार्टमेंटच्या नावासह punefed@gmail.com ई-मेल पाठवा. किंवा चारुहास कुलकर्णी यांना ९५५२५४६६०७ या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा.
- पाणीपुरवठा, वीजपुरवठा, स्मार्टसिटी इत्यादींशी संबंधित प्रश्न ः सागर वाडिया यांना ८०८७८४३४९६ या क्रमांकावर स्वतःचे व सोसायटी वा अपार्टमेंटच्या नावासह व्हॉट्सॲप करा.
काय? कधी? केव्हा? कुठे?
काय? ः गृहनिर्माण सोसायट्यांचा सहकार दरबार
कधी? ः शनिवार, ७ मे 2022
केव्हा? ः सकाळी १०.३० पासून
कुठे? ः बांसुरी हॉल, हॉटेल गोविंद गार्डन, पिंपळे सौदागर
---
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59700 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..