
रमजानच्या मुहूर्तावर सामाजिक सलोख्याचा संदेश
पिंपरी, ता. ३ ः सामाजिक सलोखा आणि प्रेमाचे संबंध वाढविण्यासाठी आम्हाला शक्ती दे.. अशी दुवा करत मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन मोठ्या उत्साहात मंगळवारी ‘रमजान ईद’ साजरी केली. नमाज पठणासाठी आलेल्या मुस्लिम बांधवांनी व्यापलेले ईदगाह मैदान, सजलेल्या खाऊगल्ल्या, भरजरी कपडे घालून मिरवणारे मुले आणि शिरखुर्म्याबरोबरच बिर्याणीचा घमघमाट... अशा वातावरणात एकमेंकाना अलिंगन देत ‘ईद मुबारक’ अशा शुभेच्छा देण्यात आल्या. दोन वर्षानंतर साजऱ्या होत असलेल्या रमजान ईदमुळे मशिदीच्या आवारात ‘जश्ने माहोल’ पहायला मिळाला.
मुस्लिम बांधवांनी महिनाभर केलेले रोजे अर्थात उपवासाची रमजान ईदला सांगता झाली. भल्या पहाटेच मुस्लिम बांधव नवीन कपडे परिधान करून, अत्तर, सुवासिक तेल लावून सगळ्यांची पावले जवळच्या मशिद व मदरशांकडे वळाली. चिंचवडगाव, वाल्हेकरवाडी, चिंचवड स्टेशन, मोहनननर, चिखली घरकुल, खराळवाडी, पिंपरी, नेहरूनगर, इंद्रायणीनगर, लांडेवाडी, भोसरी, पिंपरी, काळेवाडी, कस्पटेवस्ती, थेरगाव-वाकड, काळाखडक, पिंपळे गुरव, पिंपळे निलख, नवी सांगवी, जुनी सांगवी, निगडी, आकुर्डी, दळवीनगर, कासारवाडी, दापोडी येथील मशिद आणि ईदगाह मैदानावर मुस्लिम बांधवांनी सामुदायिक नमाज अदा केली. शहरातील मशिदी व घरांवर रोषणाई केली होती.
मशिदींमध्ये नमाज पठण
ईदगाह मैदानावर सकाळी आठ वाजता सामुदायिक नमाजपठण झाले. मौलाना मिनहाज उद्दीन यांनी चिंचवडगाव येथील ईदगाह मैदानावर ‘‘एकमेकांचा आदर करत आपल्या आजूबाजुच्या सुखःदुखात मदतीला धावून जा,’’ असे आवाहन केले. अनेक बांधवांनी पाच वेळची नमाज पठण केली. निगडी येथील नुरानी मशिदमध्ये मौल्लाना शाहीद सलाम रेहमान व हाफिज जहुर अहमद यांनी नमाज पढविला. रशिद शेख, लियाकत शेख, मुजीब शेख, समद मुल्ला आदींनी संयोजन केले. आकुर्डीत मदिना मशिद, अक्सा मशिद, निगडी ट्रान्सपोर्टनगरमध्ये फातिमा मशिद, नुरूल इस्लाम मशिद, कस्तूरी मार्केटमध्ये शमशूल, उलूम मशिदमध्ये नमाज पढविण्यात आला. चिंचवड स्टेशन दवा बाझार येथील समा ए दिन ए आदब मशिदमध्ये नमाज पठण झाले. अध्यक्ष अब्दुलकदीर मन्यार, जाकीर मेमन, राजमहम्मद अत्तार, फिरोज पठाण, मोहसीन मुल्ला, जहीर सय्यद, निहाल शिकलगार, आशरफ जमादार आदी उपस्थित होते. चिंचवड स्टेशन येथील जामिया गौसिया मशिदीमध्ये मौल्लाना फैज अहमद फैज यांनी नमाज पढविला. रमजान ईदच्या नमाज पठणानंतर शहरातील विविध ठिकाणच्या कब्रस्थानावर मुस्लिम बांधवांनी आपल्या पूर्वजांच्या कबरीच्या ठिकाणी जावून त्यांना फातेहाची नमाज केली.
घरोघरी शिरखुर्म्याचा स्वाद
शहरातील विविध सामाजिक संस्थांनी गुलाब फुले देऊन शुभेच्छा दिल्या. काही संस्थांनी शिरखुर्म्याचे वाटप केले. दिवसभर कौटुंबीक कार्यक्रम झाल्यानंतर नागरिकांनी सायंकाळी विविध भागात खाद्यस्टॉलवर गर्दी केली होती. या भागातील हॉटेल आणि खाद्यपदार्थांच्या गाड्यांवरही वर्दळ पाहायला मिळाली. शहरातील मुस्लिम बांधवांच्या घरोघरी शिरखुर्म्याचा स्वाद नातेवाईक, मित्र मंडळींनी घेतला. त्यात सर्व धर्मियांचा समावेश होता. दरम्यान, नमाज पठणापूर्वी सदन कुटूंबांनी गरीब कुटूंबांना दान केले. यावेळी आलमगीर शाही मशिदच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिस उपायुक्त इप्पर मंचक यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. माजी महापौर आझम पानसरे उपस्थित होते. निहाल पानसरे, इम्रान पानसरे, अख्तर पिंजारी, नाजीम बसरी, इक्बाल शेख, इक्बाल मुलानी, चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार आदींनी संयोजन केले.
---
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59712 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..