
एसटीचे भाडे वसूल, पण कर्मचारी पगारापासून वंचित
पिंपरी, ता. ४ ः पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाला प्रासंगिक करार पद्धतीने बस दिल्या होत्या. त्या बसेससाठी दहा चालक आणि वाहकांना ड्यूटी लावली होती. मात्र, काही कारणास्तव बस रद्द करण्यात आली. आगाराने पोलिसांकडून रद्द एसटीचे भाडे वसूल केले, पण ३० एप्रिल २०१९ रोजी प्रत्यक्ष कर्तव्य करूनही कर्मचाऱ्यांना पगारापासून वंचित ठेवले आहे. या वेतन हजेरीसाठी दोन वर्षांपासून चालक लढा देत आहेत. आता औद्योगिक न्यायालयात दाद मागणार असल्याचे कर्मचारी सांगू लागले आहेत.
लोकसभा आणि विधानसभा २०१९ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वल्लभनगर एसटी आगारातून पोलिस बंदोबस्तासाठी पोलिस आयुक्तालयाने प्रासंगिक करार पद्धतीने बसची मागणी केली होती. त्यासाठी १० बसचे नियोजन केले होते. ३० एप्रिल २०१९ रोजी बसवर दहा चालक आणि वाहकांना कामगिरी लावली होती. परंतु काही कारणास्तव बस रद्द करण्यात आली. पण तत्कालीन आगार व्यवस्थापक व तत्कालीन सहायक वाहन अधीक्षक यांच्या आदेशानुसार प्रत्यक्ष कर्तव्य करूनही त्या दिवसाची कामगारांना हजेरी दिली नाही. ज्या कामगारांनी काम करून अशा आठ जणांकडून रजेचा अर्ज मागविला. एकाला कर्नाटक-गाणगापूर या मार्गावर डबल ड्यूटी लावून ओव्हरटाईम दिला. ज्या कामगारांनी रजेचा अर्ज भरला नाही, अशांना दोन वर्षापासून हजेरी दिली नाही. दुसरीकडे रद्द झालेल्या बसचे भाडे मात्र वसूल करण्यात आले. दरम्यान, आगार प्रमुख स्वाती बांद्रे आणि स्थानक प्रमुख गोविंद जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध झाले नाही.
‘‘आगार व्यवस्थापक तसेच सहायक वाहन अधीक्षक यांचा हुकूमशाही कारभाराविरुद्ध कामगारांनी अपील अधिकाऱ्यांकडे दाद मागितलेली आहे. अद्याप वरिष्ठांकडून कुठलाही निर्णय होत नसल्याचे पाहून औद्योगिक न्यायालयाकडे दाद मागणार आहे. कारण हा प्रश्न सत्य आणि न्यायाचा आहे. ’’
- ओमप्रकाश गिरी, एसटी चालक वल्लभनगर आगार
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59786 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..