झाडे जगविण्याचे महापालिकेसमोर आव्हान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झाडे जगविण्याचे महापालिकेसमोर आव्हान
झाडे जगविण्याचे महापालिकेसमोर आव्हान

झाडे जगविण्याचे महापालिकेसमोर आव्हान

sakal_logo
By

पिंपरी, ता. ४ : उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, या उन्हाच्या झळा आता झाडांनाही असह्य होवू लागल्या आहेत. साहजिकच झाडांना जगविणे महापालिका उद्यान विभागासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे दोन महिन्यांसाठी खास आठ खासगी टॅंकरची व्यवस्था करावी लागली आहे. आठ प्रभागस्तरावर प्रत्येकी २ लाख ९९ हजार रुपये खर्च केला जात आहे. तरीही, अनेक झाडे तग धरत नसून ती वाळून जाण्याचे व कोमेजून जाण्याचे प्रकार समोर आले आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील बहुतांश विहिरी व कूपनलिकांना पाणी नाही. महापालिका ज्या ठिकाणांहून पाणी उचलते, त्याही विहिरी सध्या आटल्या आहेत. तसेच, कूपनलिकांचे पाणी कमी दाबाने येत आहे. एकीकडे दिवसाआड पाणीपुरवठा व कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दुसरीकडे, शहरभरातील झाडांना किमान दिवसाआड पाणी देणे आवश्यक आहे. परंतु, बरीच झाडे पाण्याअभावी सुकून जात असून जागेवरच जळत आहेत. शहरातील रोपवाटिकांमध्ये देखील झाडांची देखभाल-दुरुस्ती व निगा ठेवण्याचे मोठे संकट आहे. पाण्याचा अपुरा पुरवठा व उष्णतेच्या लाटांमुळे रोपे सुकून जाऊ लागली आहेत.

दापोडी भागात उड्डाणपुलावर महापालिका प्रशासनाने लावलेली झाडे उन्हामुळे कोमेजली आहेत. तसेच, भोसरी गवळी माथा ते टाटा मोटर्स रोडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील दुभाजकांमधील झाडे देखील जळाली आहेत. नुकतेच महापालिकेने शहरात सर्व ठिकाणी सुसज्ज व देखण्या कुंड्यांमध्ये मोठी झाडे लावली आहेत. त्यांना पाणी वेळेत पुरविणे आवश्यक आहे. बरेचदा, आठवड्यांतून दोन ते तीन दिवस या झाडांना पाणी मिळत नसल्याचे पर्यावरणप्रेमींनी सांगितले.

पर्यावरणप्रेमी प्रशांत राऊळ म्हणाले, ‘‘झाडांना पालापाचोळ्याचे मल्चिंग करणे आवश्यक आहे. ज्यामुळे, त्याचे बाष्पीभवन होणार नाही. जीवामृत दिल्यास पाणी पातळी योग्य राहते. ती झाडे चांगली टिकतात. पाणी देण्याच्या वेळा देखील चुकीच्या आहेत. पाणी जमीन थंड झाल्यानंतर सकाळी किंवा रात्रीच्या वेळी देणे आवश्यक आहे. देशी व विदेशी झाडांनुसार पाण्याची गरज वेगळी आहे. ते अधिकाऱ्यांना समजायला हवे. दुपारी दिलेल्या सर्व पाण्याचे बाष्पीभवन होते.
--
महापालिकेचे सहा टॅंकर
शहरातील झाडांना पाणी देण्यासाठी महापालिका टॅंकरचा वापर करत आहे. त्यासाठी टाटा मोटर्स कंपनीकडून थेट पद्धतीने सहा टॅंकर घेण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. आठ हजार लिटर क्षमतेचे पाच आणि सहा हजार लिटर क्षमतेचा एक टॅंकर आहे. टॅंकर खरेदीसाठी एक कोटी ४९ लाख १५ हजार ४०० रुपये खर्च आहे. तसेच, आरटीओ परवान्यासाठी प्रत्येकी दहा हजार रुपये असे एकूण ६० हजार रुपये शुल्क आहे. नवीन टॅंकर महापालिकेच्या अ, क, ई आणि फ क्षेत्रीय कार्यालयांना दिले जाणार आहेत.
---
उद्याने सुशोभित आणि हिरवीगार ठेवण्यासाठी पाण्याचा वापर आवश्यक आहे. वेली, झाडे, तसेच स्वच्छतागृह, दुभाजकामधील झाडे तसेच मोठी उद्याने, नर्सरीला मोठ्या प्रमाणात पाण्याचा स्रोत आवश्यक आहे. यासाठी, महापालिकेने सांडपाणी प्रक्रियेवर पुनर्वापर करून उद्याने व झाडांसाठी वापर करणे आवश्यक आहे. शहरात दहा ते बारा सांडपाणी प्रकल्प आहेत. त्याचे पाणी टॅंकरने झाडांना पुरवावे. खासगी टॅंकर मागविण्याची गरज मुळात नाहीच. ड्रेनेज विभागाचे हे काम आहे. त्यांनी दिवसाआड पाणी पुरविणे आवश्यक आहे.
- प्रभाकर तावरे, पर्यावरणप्रेमी अभ्यासक
-----
सध्या विहिरी, कूपनलिकांनाही पाणी कमी आहे. पाण्याची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे खासगी टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरु आहे. १५ एप्रिलपासून टंचाई जाणवत आहे. उन्हाळ्यामध्ये दोन महिन्यांच्या कालावधीसाठी केवळ हा प्रयोग केला आहे.
- सुभाष इंगळे, उद्यान विभाग

---

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59931 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top