
जन्मतः प्राप्त झालेले अधिकार म्हणजे मानवाधिकार ः मोकाशी
पिंपरी, ता. ४ ः ‘‘माणसाला जन्मतः प्राप्त झालेले अधिकार म्हणजे मानवाधिकार होय!,’’ असे प्रतिपादन मानव अधिकार अभ्यासक अविनाश मोकाशी यांनी केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे निगडी-प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर सदनात आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमालेत ‘मानव अधिकार : समज-गैरसमज’ विषयावर मोकाशी बोलत होते. सनदी लेखापाल रवी राजापूरकर, मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथन नायर, सहसचिव रमेश बनगोंडे, संस्कृती संवर्धन आणि विकास महासंघाचे संस्थापक रविकांत कळंबकर उपस्थित होते. मोकाशी म्हणाले, ‘‘अहार्या अधिकारा:’ या संस्कृत व्याख्येनुसार जे अधिकार कधीच हिरावून घेता येत नाहीत, त्यांना मानवाधिकार म्हटले जाते. हा वैश्विक विषय आहे; तसेच माणसाच्या दैनंदिन जीवनातील सर्व गोष्टींचा समावेश मानवाधिकारांमध्ये करता येतो. मानवाधिकार ही प्राचीन संकल्पना असली तरी १० डिसेंबर १९४८ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने जाहीरनामा प्रसूत करून यासंबंधीची मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली आहेत. १९९३ मध्ये भारतामध्ये मानवाधिकार कायदा अस्तित्वात आला. मानवाधिकार कायद्यानुसार मानवी हक्कांचे हनन झाल्यास नुकसान भरपाई मिळण्याची तरतूद आहे. मानवाधिकार कायद्याच्या व्याप्तीची माहिती नसणे, शासकीय यंत्रणा सक्रिय नसणे आणि न्यायसंस्थांनी डोळ्यांवर बांधलेली पट्टी या कारणांमुळे मानवाधिकारांचे उल्लंघन होऊनही सर्वसामान्य माणसाला त्या संदर्भात न्याय मिळत नाही. आपल्या अधिकारांची जोपासना करताना दुसऱ्यांच्या न्याय्य हक्कांवर गदा येणार नाही, याचे भान ठेवले पाहिजे.’’
डॉ. अजित जगताप यांनी प्रास्ताविक केले. शिवानंद चौगुले आणि गिरीश देशमुख यांनी परिचय करून दिला. ज्योती कानेटकर यांनी सूत्रसंचालन केले. विकास देशपांडे यांनी आभार मानले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59937 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..