
लिंबू प्रतिकिलो १५० रूपये
पिंपरी, ता. ४ : पिंपरीतील लालबहादूर शास्त्री भाजी मंडईत गेल्या महिन्याभरापासून लिंबाची आवक कमी झाली आहे. अवकाळी पावसाचा हा परिणाम असून रसरशीत लिंबांना मागणी असूनही बाजारात उत्तम दर्जाचे लिंबू उपलब्ध नाहीत. मात्र, हॉटेल व्यावसायिक व किरकोळ व्यावसाईकांना गरजेपोटी खरेदी करावी लागत आहे. बुधवारी १२० ते १५० रुपये प्रतिकिलो भाव होता. किरकोळ विक्रेत्यांनी सरबत ग्लासचा दर दहा रूपयांवरून २० रुपये केला आहे. घरगुती लिंबू वापराचे प्रमाण त्या तुलनेत कमी आहे.
---
सध्या २५ ते ३० किलोच्या लिंबाच्या गोण्या येतात. दिवसभरात २०० च्या तुलनेत गोण्या बाजारात येतात. यापूर्वी त्याचे प्रमाण जास्त होते. या महिन्याभरात मागणी वाढल्याने आवक कमी झाली आहे.
- राजू शिंदे, आवक प्रमुख, पिंपरी मंडइ
---
उन्हाळ्यात लिंबाचे लोणचे यावेळी बनविले नाही. आधी दहा रुपयांमध्ये पाच लिंबू तरी मिळायचे. आता दहा रुपयांत दोन लिंबू कोणी देत नाही. त्यामुळे, लिंबाएवजी आता आम्ही रेडीमेड सरबत तयार करतो.
- नीता रांजणे, गृहिणी
---
जी गोष्ट महाग झाली आहे, ती हंगामात वापरायची नाही. त्या वस्तूचा सिझन संपला की, लिंबू घ्यायचे. एवढी महागाई असल्याने प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागत आहे.
- पूनम साबळे, गृहिणी
---
मांसाहारी हॉटेल असल्याने लिंबाचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. त्यामुळे, ठोक पद्धतीने लिंबू जास्त प्रमाणात उचलल्यास भाव कमी करुन दिला जातो. त्यामुळे १०० ते १२० रुपये दरानेही आम्हाला लिंबू मिळत आहे.
- रुपेश शिंदे, हॉटेल व्यावसायिक, चिंचवडगाव
--
गणेश भाजी मंडईत किरकोळ व्यावसायिक २०० रुपये किलोप्रमाणे लिंबूची विक्री करत आहेत.
संतोष बडे, भाजी विक्रेता, भोसरी
......................
मोशी उपबाजारात
तीस क्विंटलची आवक
मोशी : येथील श्री नागेश्वर महाराज उपबाजार समितीमध्ये लिंबाची आवक थंडावली आहे. बुधवारी (ता.४) केवळ तीस क्विंटल लिंबाची आवक झाली, तीही कच्च्या लिंबाची. इतर वेळी केवळ ४० ते ५० रुपये किलो असा असणारा भाव आता १४० ते १५० रुपये झाला आहे. त्यामुळे दरवर्षी उन्हाळ्यात सरबतासाठी प्रचंड मागणी असणारा लिंबू आता घराघरांतून गायब झाला आहे.
घाऊक विक्रेते शिवाजी बढे म्हणाले, ‘‘मागील वर्षी चांगले टपोरे पिवळेधमक लिंबू जास्तीत जास्त ऐंशी ते शंभर रुपयांनी विकले आहे. मात्र, यावर्षी प्रतवारी चांगली नसल्याने आणि आवकही कमी असल्याने आम्ही सध्या लिंबे विकणेच बंद केले आहे. कारण हिरवी अर्धवट कच्ची असलेल्या लिंबांकडे गिऱ्हाईकांनीही पाठ वळविली आहे.’’
फोटो ओळी : श्री नागेश्वर महाराज उपबाजार समिती, मोशी : अर्धवट, हिरवी कच्ची लिंबांची झालेली आवक
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60021 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..