एक्स्प्रेस रेल्वेचे आरक्षित डबे झाले जनरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Railway Bogie
रेल्वेचे आरक्षित डब् झाले जनरल

एक्स्प्रेस रेल्वेचे आरक्षित डबे झाले जनरल

पिंपरी - रेल्वे प्रशासनाने (Railway Administrative) कोरोना संपल्यावरही पॅसेंजर गाड्यांची (Passenger Railway) सेवा सुरळीत केलेली नाही. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. अद्याप मेल, एक्स्प्रेस गाड्यांना जनरल डबे (General Bogie) जोडलेले नाहीत, तरीही प्रवासी आता आरक्षित डब्यात (Reservation Bogie) बसून प्रवास करतात. त्यामुळे आरक्षण असूनही अन्य प्रवाशांना येण्या-जाण्यासाठी जागा मिळत नाही. गर्दीमुळे पाय ठेवायला मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे रेल्वेत आरक्षित डब्यांनाही जनरलचे स्वरूप आले आहे.

केवळ कन्फर्म आरक्षण असलेल्या प्रवाशांनाच कोरोना काळात गाड्यांमध्ये प्रवेश दिला जात होता. मात्र आता स्थानकावरील तिकीट खिडकीवरून वेटिंग तिकीट काढून प्रवासाच्या दिवसापर्यंत तिकीट कन्फर्म न झाल्यास, वेटींगच्या तिकीटावरच प्रवास करण्यावर प्रवाशांचा अधिक भर आहे. त्यामुळे वेटिंग तिकिटधारकांचे प्रमाण अधिक वाढले आहे. दरम्यान, एसटीच्या बेमुदत संपामुळे एसटीचा प्रवासी रेल्वेकडे वळला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून रेल्वेच्या सर्वच गाड्या हाऊसफुल्ल धावत आहेत.

उन्हाळी सुट्‌टी सुरू झाल्यामुळे लोक गावी जावू लागले आहेत. द्वितीय श्रेणीतील डबे खच्चून भरलेले आहेत. गाडीच्या दरवाजापासून मोकळे पॅसेज ते शौचालयांच्या शेजारी बसूनही प्रवास करत आहेत. आरक्षित डब्यांमध्येही अनेकजण उभे राहून प्रवास करत आहेत. चिंचवडमधून सुटलेल्या आणि मुंबईतून सुटलेल्या सिंहगड, कोयना, इंद्रायणी, डेक्कन एक्स्प्रेसला नेहमीपेक्षा अधिक गर्दी होत आहे. आता तर ऐन उन्हाळी सुट्टीतही प्रवाशांना वेंटिगवर थांबावे लागत आहे. या गाड्याची प्रतीक्षा यादी ३०० ते ३५० पर्यंत होती. कन्फर्म तिकीट नसतांनाही अनेक प्रवासी हे रेल्वे गाडीतून प्रवास करत आहे. पंधरा दिवसांपूर्वी अपेक्षेने प्रवाशांनी आरक्षण केले; मात्र त्यांची निराशा झाली. आरक्षित सर्वच डब्यांमध्ये पाय ठेवायलाही जागा नसल्यामुळे टीसीनीही आरक्षित डब्यातील प्रवाशांची तिकिटे तपासण्यासाठी जाण्याचे धाडस दाखवत नाहीये. एकंदरीत रेल्वेने अद्याप जनरल डबे सुरू केले नसले तरी उत्तर भारतातून येणाऱ्या गाड्यांच्या आरक्षित डब्यांना जनरलचे स्वरूप आले आहे. रेल्वे प्रशासनाकडे प्रवाशांनी वारंवार मागणी करूनही जनरल तिकीट व डबे मेल, एक्स्प्रेस गाड्यांना जोडले जात नसल्याने, प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त होते.

माणुसकीचे दर्शन

बुधवारी आरक्षित डब्यात उभे राहण्यासाठीही जागा नव्हती. अशा परिस्थितीत एका तरुणीच्या कुटुंबातील तीन जणांचे तिकीट कन्फर्म होते. पण काही कारणास्तव प्रवास तिला एकटीलाच करावा लागल्याने दोन सीट मोकळ्या होत्या. त्या मुलीने मुंबईतून प्रवास करणाऱ्या दोन महिला प्रवाशांना आपल्या सीटवर बसण्यासाठी जागा करून दिली. स्वतः ऐसपैस बसण्याऐवजी एका ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला जागा बसायला दिली. त्या गर्दीतही तिने दाखवलेल्या माणुसकीने माणसेही भारावलो.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60031 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top