प्रस्तापितांसह नवख्यांमध्ये उत्साह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रस्तापितांसह नवख्यांमध्ये उत्साह
प्रस्तापितांसह नवख्यांमध्ये उत्साह

प्रस्तापितांसह नवख्यांमध्ये उत्साह

sakal_logo
By

पिंपरी, ता. ५ ः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिला आहे. आता आयोग व राज्य सरकार काय भूमिका घेणार? याकडे लक्ष असले तरी, शहर पातळीवरील सर्वच राजकीय पक्ष महापालिका निवडणुकीसाठी आखाड्यात उतरल्याचे चित्र आहे. निवडणूक केव्हाही झाली तरी आम्ही सज्ज आहोत, अशीच सर्वांची भूमिका आहे.

त्यासाठी सर्व इच्चुकांची जय्यत तयारी असून, प्रस्तापितांसह नवख्यांचा उत्साह दांडगा आहे. महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक मुदत संपण्यापूर्वी अर्थात १३ मार्चपूर्वी होणे अपेक्षित होते. मात्र, इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न घेण्याची सर्व पक्षांची भूमिका, राज्य निवडणूक आयोगाचे राज्य सरकारने कायदा करून स्वतःकडे घेतलेले अधिकार यामुळे निवडणूक लांबलीवर पडली. सरकारच्या भूमिकेविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. त्यावर सुनावणी होऊन राज्य सरकारच्या विरोधात निकाल गेला आहे. ‘दोन आठवड्यात निवडणूक घेण्याबाबत कार्यवाही करा’ असा आदेश न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिला आहे. त्यामुळे आयोगाच्या भूमिकेकडे राजकीय पक्ष व इच्छुकांचे लक्ष लागून आहे. असे असले तरी, महापालिका निवडणूक केव्हाही होऊ द्या, आम्ही तयार आहोत,’ अशी भूमिका शहरातील राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.

राजकीय पक्षांची तयारी...
- महेश लांडगे, आमदार तथा शहराध्यक्ष, भाजप ः ‘अब की बार, १०० पार’ असा भाजपचा निर्धार आहे. संघटनात्मक बांधणी मजबूत आहे. शहरात सहा मंडल पदाधिकाऱ्यांची संख्या ५५० आहे. जिल्हा कार्यकारिणीत १५० पदाधिकारी आहेत. ३५३ शक्तीकेंद्र प्रमूख असून १ हजार ३०८ बूथप्रमुख कार्यरत आहेत.
- अजित गव्हाणे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस ः राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कधीही जाहीर केली तरी बुथ कार्यकर्त्यापासून पदाधिकारी व माजी नगरसेवकांपर्यंत सर्वजण सज्ज आहेत. शहराने नेहमीच राष्ट्रवादीला कौल दिला आहे. शहर विकासाच्या ‘व्हिजन’मुळे शहरातील जनता राष्ट्रवादीला पुन्हा एकदा संधी देईल.
- कैलास कदम, शहराध्यक्ष, कॉंग्रेस ः महापालिका निवडणुकीसाठी पक्षाने जय्यत तयारी केली आहे. महाविकास आघाडीचे नेते व कॉंग्रेस पक्षाचे राज्य पातळीवरील नेते निर्णय घेतील. त्यांच्या आदेशानुसार महापालिका निवडणूक लढविली जाईल. महापालिकेत सत्तांतर घडेल हे नक्की आहे. भाजपचा पराभव करणे हेच आमचे ध्येय असेल.
- सचिन भोसले, शहरप्रमुख, शिवसेना ः महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी शिवसेना सर्व ताकदीने रिंगणात उतरणार आहे. पक्षाचे नेते ठरवतील त्यानुसार व त्यांच्या आदेशानुसार, पुढील कार्यवाही केली जाईल. महापालिकेतील अधिकाधिक जागा निवडून आणून सत्ता स्थापन करणे, हेच आमचे उद्दिष्ट आहे.
- सचिन चिखले, शहराध्यक्ष, मनसे ः महाराष्ट्र नवनिर्माण सेना महापालिका निवडणुकीची तयारी सहा महिन्यांपासून करीत आहे. ८० जणांची यादी तयार आहे. इतर मागासवर्गीय उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. पक्षातील ओबीसी उमेदवारांवर अन्याय होऊ दिला जाणार नाही, सर्वांना उमेदवारीत न्याय दिला जाईल.
- चेतन बेंद्रे, कार्यकारी शहराध्यक्ष, आप ः महापालिकेच्या सर्व जागा लढविणार आहे. शिक्षण व आरोग्यावर आधारित अरविंद केजरीवाल यांचे दिल्ली मॉडेल शहरात राबविणार. लोकांच्या मनातच आप असल्याने निवडणुकीमध्ये पक्ष चांगली कामगिरी करेल. जनतेचे खरे नगरसेवक महापालिकेत रुजू होतील, याची खात्री आहे.
- देवेंद्र तायडे, शहराध्यक्ष, वंचित आघाडी ः महापालिकेची निवडणूक सर्व जागांवर लढविणार आहे. आमच्या पक्षात ओबीसींची स्वागत आहे. कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही. इच्छुकांना उमेदवारी देऊन न्याय दिला जाईल. शहर विकासाचा वंचितचा स्वतंत्र आराखडा आहे. सर्वांना समान न्याय, असे पक्षाचे धोरण आहे.
- स्वप्नील कांबळे, शहराध्यक्ष, आरपीआय (आठवले गट) ः लोकशाही पद्धतीने पक्षाची कार्यकारिणी निवडली आहे. आमचे एक लाख सात हजार ७५० सदस्य आहेत. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार महापालिका निवडणूक लढवू. ३९ जागांवर आम्ही निवडणूक लढविणार आहोत.
--

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60278 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top