
पोलिसांचा चोख बंदोबस्त, भोंग्यांचा आवाज मर्यादित, शहरात शांतता
पिंपरी - राज्यभर मशिदींवरील (Masjid) भोंग्यांच्या (Loudspeaker) मुद्द्यावरून तणावाचे (Tension) वातावरण असताना शहरात शांतता (Peace) दिसून आली. हिंदू-मुस्लिम संमिश्र लोकवस्तीच्या ४० मशिदींमधून पहाटेची अजान (Azaan) भोंग्याविना देण्यात आली. तर बहुतांश ७० मशिदींमध्ये डेसिबल मर्यादा पाळून ध्वनीक्षेपकावर अजान झाली. पोलिसांचा बंदोबस्त आणि आवाज मर्यादित ठेवल्याने रमजान ईदपासून नमाजही शांततेत पार पडत असल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे.
शहरात ११० मशिदी आहेत. तसेच ३ ईदगाह आणि ठिकठिकाणी मदरसे आहेत. शहरात सुमारे पाच लाख मुस्लिम बांधव आहेत. सामाजिक सलोखा जपण्यासाठी काळेवाडी, थेरगाव, मोरवाडी, चिंचवड, पिंपरी भागातील मशिदींसह संमिश्र ठिकाणच्या मशिदींमध्ये पहाटे सव्वापाचला विनाभोंगा अजान देण्यात आली. मात्र, इतर चारवेळची अजान डेसिबल मर्यादा पाळून दिली गेली. ‘सकाळ’ प्रतिनिधीने पाहणी केल्यावर अनेक ठिकाणच्या ८० टक्के मशिदींवर भोंगेच नसल्याचे आढळून आले. मशिदींवरील भोंग्याचा आवाज कमी राहिला व अनेक ठिकाणी अजान झाली नाही. दवाबाजार, संत तुकाराम नगर, मासुळकर कॉलनी येथील एकाही मदरशात अजानवेळी भोंगे वाजले नाहीत. पोलिसांनी केलेल्या आवाहनामुळे प्रार्थनास्थळांवरील भोंगे बंद ठेवण्यात आले होते.
मुस्लिम बांधवांचा आदर्श निर्णय
अनेक ठिकाणी भोंग्याविना अजान व नमाज करण्याचा निर्णय मुस्लिम समाजाने घेतला आहे. तवकल्लाह जामा मस्जिद कमिटीच्या प्रमुख मुस्लिम बांधवांची बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय शहरातील ४० मशिदींना कळवण्यात आला आहे. ठिकठिकाणच्या मशिदीमध्ये सलोखा बैठक आयोजित केली होती. यामध्ये सर्वधर्मीयांनी नियमांचे काटेकोर पालन करावे व समाजामध्ये शांतता राहील असे प्रयत्न करावेत, असे त्यांनी आवाहन केले.
पहाटेपासून कडक बंदोबस्त
रमजान ईदपासून पोलिसांनी पहाटे चार वाजल्यापासूनच मशिदींसमोर कडक बंदोबस्त ठेवला आहे. काही ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याने पोलिसांच्या हातावर तुरी देण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांच्या सजगतेमुळे सलोखा टिकून राहिल्याचे नेहरूनगर जामा मस्जिदीचे विश्वस्त मुनाफ तरसगार यांनी सांगितले. तसेच संपूर्ण दिवसभर वातावरण शांत होते, तर पोलिसांनी नमाजाच्या वेळेस मशिदीबाहेर बंदोबस्त ठेवलेला आहे. मशिदीमधील नमाज पठणच्या वेळीही आवाज अल्प प्रमाणात ठेवला आहे.
चिंचवड ट्रस्टींनी घेतली परवानगी
बुधवारी (ता.४) जाधववाडी, कुदळवाडी -चिखली परिसरात नईम चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली पोलिसांसोबत मौलवी आणि ट्रस्टींची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत मुस्लिम बांधवांनी शांततेची आणि सामंजस्याची भूमिका घेत भोंग्यावरील सकाळची अजान टाळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शहरात कुठेही ‘मनसे’ला भोंगे वाजवण्याची संधी मिळाली नाही. न्यायालयाने दिलेल्या अटी व शर्तीनुसार कमी डेसिबलने अजान दिल्यास कायद्याचे पालन होईल याची ग्वाही दिली. यावेळी ट्रस्टी याकूब शेठ आणि शाही जामा मशिदीचे ट्रस्टी फिरोज शेख उपस्थित होते.
अजानच्या वेळा
-पहाटे सव्वापाच
-दुपारी दीड वाजता
-सायंकाळी पाच वाजता
-सायकांळी सात वाजता
-रात्री ८.४५ वाजता
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60540 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..