
तत्कालीन परिस्थितीमुळे देशाची फाळणी अपरिहार्य होती
पिंपरी, ता. ६ ः ‘‘अखंड भारत ही कितीही चांगली आणि भावनाप्रधान संकल्पना असली तरी तत्कालीन परिस्थितीमुळे देशाची फाळणी व्यवहार्य अन् अपरिहार्य होती,’ असे प्रतिपादन प्रा. डॉ. बालाजी चिरडे यांनी केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळातर्फे निगडी- प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर सदनात आयोजित छत्रपती शिवाजीमहाराज व्याख्यानमालेत ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फाळणीविषयक दृष्टिकोन’ या विषयावरील अंतिम पुष्प गुंफताना प्रा. चिरडे बोलत होते. माजी खासदार प्रदीप रावत, ठाणे जिल्हा सहकारी बँकेचे धनंजय कुलकर्णी, मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथन नायर, सचिव प्रदीप पाटील उपस्थिती होते. प्रा. चिरडे लिखित ‘१८५७ : सावरकरांची भूमिका’ आणि ‘त्रिकालवेध’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन झाले. ते म्हणाले, ‘‘भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव जवळ येऊन ठेपला असला तरी देशाच्या फाळणीचा विषय अजूनही संपलेला नाही. फाळणीचे दु:ख अजूनही बहुसंख्य भारतीयांच्या मनांत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘पार्टिशन ऑफ इंडिया’ या ग्रंथात फाळणीच्या भूमिकेविषयी सविस्तर ऊहापोह आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अखंड हिंदुस्थानाचे स्वप्न पाहिले होते. एक व्यक्ती, एक मत ही त्यांची भूमिका होती.’’ श्रीराम रानडे यांनी प्रास्ताविक केले. चंद्रशेखर जोशी आणि गीता खंडकर यांनी परिचय करून दिला. सतीश सगदेव यांनी सूत्रसंचालन केले.
--
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60672 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..