आचार्य अत्रे रंगमंदिरात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आचार्य अत्रे रंगमंदिरात
आचार्य अत्रे रंगमंदिरात

आचार्य अत्रे रंगमंदिरात

sakal_logo
By

आशा साळवी
पिंपरी, ता. ७ ः आचार्य अत्रे रंगमंदिरात सुविधांचा बोलबाला आहे. व्हीआयपी खुर्च्या, साफसफाई, वातानुकूलित यंत्रणा, स्वच्छतागृहात पाणी मुबलक, फ्लोअरिंग, रेखीव रंगमंच आणि सुसज्ज ध्वनियंत्रणा कार्यान्वित आहे. मात्र, महापालिकेने पाच कोटी खर्चूनही हे रंगमंदिर नाट्यसंस्था, निर्माते यांच्या पसंतीस उतरत नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी, २० वर्षात नाटकाचा ‘पडदा’ उघडला नसल्याचे चित्र समोर आले आहे. दरम्यान, रंगमंदिरात नाटकाच्या प्रयोगाऐवजी भुताटकीचा ‘प्रयोग’ पाहायला मिळाल्याची चांगलीच रंगली होती.

सांस्कृतिक वैभवात भर घालणाऱ्या अत्रे रंगमंदिराची पिंपरी-संत तुकारामनगरमध्ये २००२ मध्ये निर्मिती केली. काही वर्षांपूर्वी रंगमंदिर प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचा विषय होता. आसन क्षमता ६०० इतकी आहे. मात्र, शहराच्या कोपऱ्यात रंगमंदिर असल्यामुळे नाट्य व्यावसायिकांच्या गैरसोयीचे ठिकाण बनले आहे. त्याचा वापर सांस्कृतिक कार्यक्रमापेक्षा इतर खासगी कार्यक्रमांसाठी जास्त प्रमाणात केला जात असल्याचे दिसून येत आहे. मागील काही वर्षात रंगमंदिराच्या देखभालीवर ठेकेदार गब्बर झाले आहेत. परंतु नाटक, कार्यक्रमातून तो खर्च अद्याप वसुल झालेला दिसून येत नाही.

पार्किंगची गैरसोय
रंगमंदिरात नाटकाऐवजी खासगी संस्थांचे कार्यक्रम, शाळांचे स्नेहसंमेलन, धार्मिक सभा, बँकांच्या सर्वसाधारण सभा, चर्चासत्रे, विवाह मेळावे, राजकीय पक्षाचे मेळावे, महापालिकेचे कार्यक्रम जास्त होत असल्याचे दिसून येत आहे. सुसज्ज रंगमंदिरात नाट्य संस्थेचे नाटकांचे प्रयोग होईनासे झाले आहेत. पार्किंगची गैरसोय असल्याने रंगमंदिरात नाटकांचे प्रयोग लावण्यास निर्माते धजावत नाहीत. ३० च्यावर चारचाकी वाहने लावता येत नाही. दाट लोकवस्ती असल्याने दुचाकी, तीन चाकी वाहने रस्त्यावर थांबावी लागताहेत. परिणामी रस्ते अरुंद असल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. नाट्य संस्थांच्या उदासीनतेचा फटका रसिक श्रोत्यांबरोबरच महापालिकेला बसू लागला आहे. त्यामुळे नव्याने उदयास येणारी सांस्कृतिक चळवळ ठप्प होण्याच्या मार्गावर आहे.

महिन्याकाठी अडीच लाख वीजबिल
दुरुस्तीसाठी रंगमंदिर ५ वर्षांपासून बंद आहे. या रंगमंदिराच्या नूतनीकरणासाठी साधारण पाच कोटींचा खर्च आला आहे. या सगळ्या कामामध्ये विद्युतीकरणाच्या कामाला अधिक विलंब लागला. पण आता विद्युतबिल सर्वाधिक येत आहे. दर महिन्याला अडीच लाख वीजबिल येत आहे. त्यातुलनेत सांस्कृकित कार्यक्रम होत नसल्याने आर्थिक बोजा महापालिकेला सहन करावा लागतोय. दरमहा दीड लाख रुपये उत्पन्न मिळत असल्याचे कर्मचाऱ्यांनी दावा केला आहे.


भुताटकीचा ‘प्रयोग’
या रंगमंदिरात ‘बांगड्या’, ‘पैंजणांचा’ आवाज येत असल्याची अफवा पसरली होती. या रंगमंदिरात भुताटकी असल्याची अफवा ‌उठल्याने हे रंगमंदिर चांगलेच चर्चेत आले होते. दरम्यान, महापालिकेने ठेकेदाराच्या माध्यमातून २४ ऑगस्ट २०१७ पासून या रंगमंदिराचे नूतनीकरण करण्याचे काम पालिकेने हाती घेतले होते. मे २०१८ पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. पण झाले नाही. तेवढ्यात तेथे भुताटकी असल्याची अफवा पसरली. परिणामी भूत असल्याच सांगत सर्व कामगारांनी पळ काढला. त्यानंतर ठेकेदाराने विधिवत पूजाअर्चा केल्याने वातावरण चांगलेच तापले होते. या प्रकरणात ठेकेदारासह इतर काही व्यक्तींना अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत अटक देखील झाली होती. ठेकेदार आणि तीन कामगारांना एक दिवसाची पोलिस कोठडीदेखील मिळाली होती. या सर्व प्रकारावर ‘पडदा’ पडला आणि कामाला सुरवात झाली. परिणामी, रसिकांना रंगमंदिरात नाटकाच्या प्रयोगाऐवजी भलताच ‘प्रयोग’ पाहायला मिळाला.

हे करू शकता
-पार्किंगची सोय करावी.

-अत्रे रंगमदिराची जाहिरात करावी.
-अनामत रक्कम कमी घ्यावी

-नाटकाच्या वेळा वाढवाव्यात
-कार्यक्रमाच्या दिवशीचे वीजबिल माफ करावे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60842 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top