
‘देहू-भुयारी गटार योजना पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावी’
देहू, ता. ६ ः तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत शासनाने ३५ कोटी रुपये खर्च करून भुयारी गटार योजना आणि मलनिस्सारण योजनेचे काम केले. मात्र, या योजनेत अनेक त्रुटी असून सांडपाणी रस्त्यावर येत आहे. तसेच मलनिस्सारण प्रकल्प बंद आहे. त्यामुळे या योजनेचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावी, अशी मागणी देहूनगरपंचायतीच्या सदस्यांनी शुक्रवारी (ता.६) बैठकीत केली.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी धनंजय जगधने, नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा स्मिता चव्हाण, पुनम काळोखे, गटनेते योगेश परंडवाल, बांधकाम विभागाचे सभापती योगेश काळोखे, आदित्य टिळेकर, प्रवीण काळोखे आदी उपस्थित होते.
जीवन प्राधिकरणाच्या अखत्यारित झालेल्या या योजनेचे काम काही ठिकाणी अपूर्ण आहे. अनेक भागात चेंबर्समधून मैलापाणी जमिनीत झिरपत आहे. त्यामुळे विंधन विहीर, विहिरीतून दूषित पाणी येत आहे. त्यामुळे नगरपंचायतीच्या वतीने तातडीने बैठक बोलविली. याबाबत नगराध्यक्षा स्मिता चव्हाण यांनी सांगितले की, या योजनेतील त्रुटी दोन महिन्यात पूर्ण कराव्यात. ज्या ठिकाणी पाइप लाईन नाही, त्याठिकाणी पाइपलाइन टाकावी. चेंबर्सची दुरुस्ती करावी. मलनिस्सारण प्रकल्प कार्यान्वित करावा, अशा सूचना जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. येत्या दोन दिवसांत प्राधिकरणाचे एक अभियंतासोबत गावठाण वगळून इतर भागात असलेल्या योजनेतील कामे करण्यात येणार आहे. कामे पूर्ण झाल्यानंतरच ही योजना नगरपंचायत ताब्यात घेणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c60903 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..