
सध्या देशाचे अर्थचित्र अनिश्चित स्वरूपाचे अभय टिळक यांचे प्रतिपादन ः ‘आजचे अर्थचित्र : आव्हाने आणि उपाय’ या विषयावर व्याख्यान
पिंपरी, ता. ७ ः ‘‘सध्या देशाचे अर्थचित्र अनिश्चित स्वरूपाचे आहे. रशिया-युक्रेन युद्धाने संपूर्ण जगाचे अर्थचित्र केवळ अस्थिर नव्हे तर अनिश्चित झाले आहे.’’ असे प्रतिपादन ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अभय टिळक यांनी केले.
चापेकर स्मारक, चापेकर चौक, चिंचवड येथे पिंपरी-चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समिती अंतर्गत गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आयोजित पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमालेत ‘आजचे अर्थचित्र : आव्हाने आणि उपाय’ या विषयावरील प्रथम पुष्प गुंफताना अभय टिळक बोलत होते.
पिंपरी-चिंचवड पोलिस उपायुक्त आनंद भोईटे अध्यक्षस्थानी होते. तर माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, उद्योजक गणेश भिसे आणि गांधीपेठ तालीम मित्रमंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे उपस्थित होते. याप्रसंगी कोरोना काळात आपत्कालीन वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. जयवंत श्रीखंडे यांचा विशेष सन्मान केला. यावेळी मंडळाचे दिवंगत सदस्य गजानन चिंचवडे आणि वैभव गोडसे यांना श्रद्धांजली अर्पण केली.
टिळक म्हणाले, ‘‘मानवी व्यवहार संतुलित होण्यासाठी शाश्वत अन् अशाश्वत धनाची आवश्यकता भासते. जागतिकीकरणामुळे आपला देश वैश्विक अर्थचित्राचा एक अविभाज्य भाग झाला आहे. २००८ साली अमेरिकेत आर्थिक अरिष्ट उद्भवले. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी आपल्या देशात नोटबंदी झाली. त्यानंतर नवी वस्तू सेवा करप्रणाली स्वीकारण्यात आली. दोन वर्षे कोविडमुळे जागतिक अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडाला. त्यातून सावरत असतानाच रशिया-युक्रेन युद्ध पेटले. त्यामुळे गहू आणि खनिज तेलाच्या वितरणावर विपरीत परिणाम झाले आहेत.’’ सुहास पोफळे यांनी प्रास्ताविक केले. विजय बोत्रे यांनी सूत्रसंचालन केले. महेश गावडे यांनी आभार मानले. व्याख्यानानंतर प्रश्नोत्तरे झाली. गांधीपेठ तालीम मित्रमंडळाच्या सदस्यांनी संयोजनात परिश्रम घेतले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61092 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..