गुन्हे वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हे वृत्त
गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

sakal_logo
By

पिंपरीत महिलेची सव्वा दोन लाखांची फसवणूक
पिंपरी, ता. ९ : बँकेतून बोलत असल्याचे सांगत ओटीपी शेअर करण्यास भाग पाडून महिलेची सव्वा दोन लाखांची फसवणूक केली. हा प्रकार पिंपरी येथे घडला.
याप्रकरणी शबनम मोहमंद सय्यद (रा. नेहरूनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने महिलेला फोन करून आयसीआयसीआय बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. फिर्यादीच्या क्रेडिट कार्डचे शेवटचे चार अंक सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांच्या मोबाईलवर ओटीपी पाठवून तो शेअर करण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादीच्या क्रेडिट कार्डवरून दोन लाख ३६ हजार ८४० रुपये डेबिट करून घेत फिर्यादीची फसवणूक केली. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

भोसरीत कार्यालयात शिरून साहित्याची तोडफोड
कार्यालयात शिरून तलवार व पाईपने साहित्याची तोडफोड केली. तसेच दोघांना मारहाण केली. हा प्रकार भोसरी येथे घडला. याप्रकरणी अनिता लक्ष्मण सरवदे (रा. बालाजीनगर,, भोसरी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार संदीप नलावडे (रा. बालाजीनगर, भोसरी) व त्याच्या एका साथीदारावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी हे शनिवारी (ता. ७) सायंकाळी साडे सातच्या सुमारास फिर्यादी यांचा मुलगा महेंद्र यांच्या संपर्क कार्यालयात शिरले. तलवार व लोखंडी पाईपने संगणक व इतर साहित्याची तोडफोड केली. महेंद्र यांना मारण्याची धमकी दिली. तर त्याच्या शेजारी राहणारा भैया नवगिरे यालाही मारहाण केली. भोसरी एमआयडीसी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

रहाटणीत महिलेची ५० हजाराची फसवणूक
महिलेशी अश्लील वर्तन करीत विनयभंग केला. तसेच मालदीव ट्रीपचे आमिष दाखवून महिलेकडून पन्नास हजार रुपये उकळून त्यांची फसवणूक केली. हा प्रकार रहाटणी येथे घडला. याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार मॅडी सूर्या या नावाचे युजर असलेला मुकेश सूर्यवंशी (रा. कल्याणीनगर, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपी व फिर्यादी यांची बंबल या डेटिंग ॲपवरून ओळख झाली. आरोपीने फिर्यादीशी जवळीक साधून सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात राहिला. त्यानंतर घरी येऊन मालदीवच्या ट्रीपसाठी ऑफर करून फिर्यादीशी अश्लील वर्तन केले. शरीरसुखाची मागणी केली. त्यानंतर २१ मार्चला फिर्यादीच्या घरी येऊन पासपोर्ट झेरॉक्सची प्रत, फोटो व पन्नास हजार रुपये घेऊन गेला. ट्रीपची तारीख उलटून गेल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादीच्या लक्षात आले. फिर्यादीला मालदीव ट्रीपबाबत खोटे सांगून त्यांच्याकडून ५० हजार रुपये उकळून फसवणूक केल्याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कृष्णानगरमध्ये डॉक्टर महिलेचे दागिने चोरीला
रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना डॉक्टर महिलेने बॅगमध्ये काढून ठेवलेले सोन्याचे दागिने चोरीला गेले. हा प्रकार कृष्णानगर येथे घडला. याप्रकरणी डॉक्टर फरझाना हलीम उद्दीम अहमद (रा. डॉक्टर रेसिडेन्सी, आसाम) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला. फिर्यादी यांनी रविवारी (ता. ८) सकाळी साडे नऊच्या सुमारास कृष्णानगर येथील अश्विनी रुग्णालयातील गेस्ट रूममध्ये त्यांची बॅग ठेवली होती. येथील ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना हातातील एक लाख रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या बांगड्या त्या बॅगमध्ये ठेवल्या होत्या. दरम्यान, या बांगड्या चोरीला गेल्या. चिखली पोलिस अधिक तपास करीत आहेत.

वाकडमध्ये महिलेला मारहाण करून विनयभंग
महिलेला मारहाण करून शिवीगाळ करीत विनयभंग केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार वाकड येथे घडला. याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार नित्या, त्याची पत्नी व सासू यांच्यावर गुन्हा दाखल झाला. फिर्यादी या वाकडमधील माऊली चौक येथून जात असताना त्यांच्या दुचाकीची लाइट आरोपी नित्या याच्या तोंडावर पडली. याचा राग मनात धरून त्याने फिर्यादीला हाताने मारहाण करून त्यांच्याशी अश्लील वर्तन केले. तसेच त्याची पत्नी व सासूनेही फिर्यादीला शिवीगाळ करीत मारहाण केली. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61618 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top