
नागरिकांच्या दृष्टीने सोयीच्या ठिकाणी टाकी उभारा
पिंपरी, ता. १० : भारतीय जनता पक्षाने महापालिकेत सत्ता असताना व राजकीय दबावातून प्राधिकरणाच्या सेक्टर क्रमांक एकमध्ये दत्त मंदिराच्या जागेवर पाण्याची टाकी उभारण्याचा प्रयत्न चालविला होता. तो न्यायालयाच्या निर्णयामुळे उघडा पडला आहे. सर्व तांत्रिक बाबींची तपासणी करून महापालिका प्रशासनाने पाण्याच्या टाकीबाबत अंतिम निर्णय घ्यावा, असा आदेश न्यायालयाने दिला. या निर्णयानंतर भाजप व राष्ट्रवादी कॉंग्रेस परस्पर विरोधी दावे करीत आहेत.
भाजपचे पितळ उघडे पडले असून, नागरिकांच्या दृष्टीने योग्य ठिकाणी पाण्याची टाकी उभारण्याचा मार्ग मोकळा झाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय उदावंत यांनी दिली आहे. गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीसंदर्भातील राजकीय संघर्षात भाजपचे माजी नगरसेवक राजेंद्र लांडगे यांनी दिलेला लढा यशस्वी झाला आहे, असा दावा भाजपने केला आहे. महापालिकेत सत्तेच्या जोरावर भाजपच्या काही नगरसेवकांनी श्रेय लाटण्यासाठी प्राधिकरणाच्या सेक्टर क्रमांक एकमध्ये पाण्याची टाकी उभारण्याचा निर्णय घेतला होता. ज्या जागेवर टाकी उभारण्याचा प्रयत्न सुरू होता. त्या ठिकाणी दत्त मंदिर असल्याने स्थानिक रहिवाशांचा त्याला विरोध होता. येथे टाकी उभारणे तांत्रिकदृष्ट्या चुकीचे असतानाही सत्तेच्या जोरावर टाकी उभारण्याचा प्रयत्न चालविला होता. प्रशासनावर राजकीय दबाव टाकून सुरू असलेल्या या प्रकाराविरोधात न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाच्या निर्णयामुळे येथील रहिवाशांचा व सर्वसामान्य नागरिकांचा विजय झाला असून, भाजपला चपराक बसली आहे, असे उदावंत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61820 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..