
शिवचरित्र कृतीत आणण्याची गरज
पिंपरी, ता. १० ः ‘‘आजच्या काळात शिवचरित्र कृतीत आणण्याची गरज आहे,’’ असे प्रतिपादन शिवव्याख्याते प्राचार्य प्रदीप कदम यांनी केले.
चापेकर स्मारक, चापेकर चौक, चिंचवड येथे पिंपरी-चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समिती अंतर्गत गांधीपेठ तालीम मित्र मंडळ आयोजित पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमालेत ते बोलत होते. ‘छत्रपती शिवाजीमहाराज आणि आजचा समाज’ या विषयावर त्यांनी चतुर्थ पुष्प गुंफले. विक्रांत ओतारी अध्यक्षस्थानी होते. उद्योजक धनंजय वाल्हेकर, किसन महाराज चौधरी, राजेंद्र घावटे, गांधीपेठ तालीम मित्र मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी कांचन इंदलकर यांना कोविडयोद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. संग्रामसिंह पाटील या बालशहिराने शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केला.
प्राचार्य कदम म्हणाले, ‘‘आजचे आमचे जगणे कुटुंबापुरती सीमित झाले आहे; तसेच आम्ही छत्रपती शिवाजीमहाराज यांनाही सीमित केले आहे. वास्तविक देश सामर्थ्यशाली करण्यासाठी शिवचरित्राचा निरंतर अभ्यास केला पाहिजे; कारण ''शिवाजी'' हा एक महामंत्र आहे. महाराष्ट्राखेरीज इतर राज्यांमधील तरुण उच्चशिक्षित होतात; मात्र, मराठी तरुण नेत्यांचे वाढदिवस आणि सोशल मीडियामध्ये रमतो. कृतिशील कार्य करणारी आणि देवाला-भावाला कधीही न फसवणारी माणसे खऱ्या अर्थाने अंतर्बाह्य सुंदर असतात. स्वातंत्र्य, समता, एकता, अखंडता, न्यायप्रियता यांचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे शिवाजीमहाराज होय. शक्ती, भक्ती, युक्ती या गुणांचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वात होता. त्यामुळे आमच्या अस्मितेचा, निष्ठेचा मानदंड म्हणून शिवाजीराजे यांच्याकडे पाहिले जाते. एकमेव राजमाता होती. शिवरायांनी जिजाऊंसाठी पाचाड येथे राजवाडा बांधला होता. आज आमच्या घरात मातापित्यांसाठी जागा नाही. त्यामुळे आज प्रत्येक घरात शिवचरित्राचे संस्कार केले तर कुटुंब, समाज आणि राष्ट्र बलशाली होईल. आज शिवाजीराजे असते तर त्यांनी जगाचे नेतृत्व केले असते." विजय बोत्रे यांनी सूत्रसंचालन केले. हेमा सायकर यांनी आभार मानले. क्षमा शिकलगार यांनी प्रास्ताविक केले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61886 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..