
गुन्हे वृत्त
चिखलीत विवाहितेचा छळ;
अश्लील फोटो व्हायरलची धमकी
पिंपरी : पैशांची मागणी करीत सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. तर पतीने त्यांचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. हा प्रकार चिखली येथे घडला. पीडित विवाहितेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती, सासू व नणंद (सर्व रा. जाधववाडी, चिखली) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. वेळोवेळी पैशांची मागणी करीत विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. पतीने विवाहितेचे अश्लील फोटो, अश्लील मेसेज व चिठ्ठी काढून फिर्यादीची आई, वडील भाऊ यांना व्हाट्सअपवर पाठवले. इतर नातेवाइकांकडे व्हायरल करण्याची धमकी दिली.
पिंपरीत दोघांवर कोयत्याने वार
पूर्वीच्या वादातून दोघांवर कोयत्याने वार केल्याची घटना पिंपरी येथे घडली. चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. विक्रांत विठ्ठल गोरडे (रा. संत तुकारामनगर, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. प्रशांत येरुनकर (वय ३६), सागर शिर्के (वय ३८), समीर कलापुरे (वय ३५, सर्व रा. संत तुकारामनगर, पिंपरी), जे. के. भाई (वय ४०, रा. चिखली) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी (ता. ८) रात्री नऊच्या सुमारास फिर्यादी व त्यांचा मित्र आयुष कांबळे हे संत तुकारामनगर येथे पान घेण्यासाठी गेले. त्यावेळी दुपारी झालेल्या वादावरून आरोपी प्रशांत याने फिर्यादीला मारण्यासाठी लाकडी स्टंप उगारला. मात्र, फिर्यादीने पकडून फेकून दिला.
निगडीत सोनसाखळी हिसकावली
तिघांना मारहाण करून सोनसाखळी हिसकावल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना निगडी येथे घडली. विक्रांत हरिश्चंद्र बिराजदार यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी निगडीतील उड्डाणपूल येथून जात असताना त्यांच्या मोटारीच्या चाकाखाली अन्नाची पिशवी आली. ती पिशवी फुटून शेजारील दुचाकीवर उडाली. त्यावेळी तेथील एकाने फिर्यादीला मोटारीतून खाली उतरण्यास सांगितले. ‘नीट गाडी चालविता येत नाही का, तुझ्या बापाचा रस्ता आहे का'' असे म्हणत धमकी व शिवीगाळ करीत हाताने मारू लागला. दरम्यान, फिर्यादीचे मेहुणे प्रतीक देशपांडे व वडील हरिश्चंद्र बिराजदार हे मोटारीतून उतरले असता त्यांनाही शिवीगाळ व मारहाण केली. तेथे आणखी तिघेजण आले. त्यांनीही शिवीगाळ व मारहाण करीत हरिश्चंद्र बिराजदार यांची सोनसाखळी हिसकावण्याचा प्रयत्न केला. तर एकाने प्रतीक यांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. व तेथून एसबीआय बँकेशेजारील बोळीतून पसार झाला. निगडी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
चिखलीत दाम्पत्याला मारहाण
दाम्पत्याला शिवीगाळ करीत मारहाण केल्याप्रकरणी दोघा भावांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार चिखली येथे घडला. शुभम काळे, अविनाश काळे (दोघेही रा. चिखली) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. रविवारी रात्री अकराच्या सुमारास फिर्यादी यांचे पती पार्किंगमध्ये गाडी पार्क करीत असताना शुभमने त्यांना मागून धक्का दिला. यावरून त्यांच्यात भांडण होऊन मारहाण करीत असताना शुभमचा भाऊ अविनाश तेथे आला. त्याने फिर्यादीसह त्यांच्या पतीला मारहाण केली. फिर्यादीच्या डोळ्यावर फटका मारल्याने त्यांना दुखापत झाली. तसेच शुभमने फिर्यादीला पोटात मारून खाली ढकलले. त्यानंतर त्यांच्याशी अश्लील वर्तन करून विनयभंग केला.
पिंपळे गुरवमध्ये एकाला अटक
घरात शिरून महिलेशी अश्लील वर्तन करीत विनयभंग करून धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही घटना पिंपळे गुरव येथे घडली. प्रणव बापूसाहेब भोसले (रा. भैरवनाथ नगर, पिंपळे गुरव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. रविवारी दुपारी तीनच्या सुमारास फिर्यादीच्या घरात कोणी नसताना आरोपी घरात शिरला. त्यांच्याशी अश्लील वर्तन केले. फिर्यादीने त्याला बाहेर काढले असता हा प्रकार कोणाला सांगितल्यास पाहून घेण्याची धमकी दिली. सांगवी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
महिलेची सोनसाखळी हिसकावली
दुचाकीस्वार महिलेची पावणे दोन लाख रुपये किमतीची सोनसाखळी चोरट्याने हिसकावली. ही घटना देहूगाव येथे घडली. मीनल मुकेश
मोरे (रा. देहूगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. सोमवारी (ता. ९) रात्री साडे नऊच्या सुमारास फिर्यादी व त्यांच्या जाऊ या एका हळदी कार्यक्रमासाठी गेल्या होत्या. तेथून दुचाकीवरून परतत असताना वैकुंठस्थान मंदिरासमोर दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी फिर्यादीच्या गळ्यातील एक लाख ८० हजार रुपये किमतीची सोनसाखळी हिसकावली.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61942 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..