
सरकारी आरोग्य यंत्रणा महापालिकेने मजबूत करावी
पिंपरी-चिंचवड महापालिकेनेही सार्वजनिक आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात. महापालिका हद्दीतील सर्व गावांमध्ये किमान पाच कम्युनिटी किंवा मोहल्ला क्लिनिक सुरू करावेत. तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करून जेनेरिक औषधेही उपलब्ध करावीत. त्यामुळे, महापालिका हॉस्पिटल ओपीडीवरील ताण कमी होईल. सर्व झोपडपट्टींमध्ये क्लिनिक सुरू करण्यात यावीत. जेथे गरिबांना मोफत तपासणी आणि औषधं दिली जातील. वायसीएम सारखे मोठे किमान १० रुग्णालये विविध ठिकाणी बांधावी. त्यासाठी बजेटमध्ये तरतूद करावी. विविध ठिकाणी जागा आरक्षित केलेल्या आहेत. त्याचा वापर करावा. मोकळ्या जागी हॉस्पिटलसाठी आरक्षण टाकण्यात यावे. त्याचाही वापर करावा. महापालिका हॉस्पिटल्समधील सध्याच्या ओपीडीची वेळ वाढवून ती सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत खुली करावी. नागरिकांकडून घेण्यात येणारे केसपेपर व गोळ्या औषधांचे पैसे घेणे बंद करावे. गर्भवती महिलांसाठी पालिकेने सोनोग्राफी मशीन उपलब्ध करावे. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारू नये. एक्स रे मशिन उपलब्ध करावीत. नियोजित मेडिकल कॉलेजमध्ये केवळ ॲलोपॅथीचे अभ्यासक्रम न ठेवता आयुर्वेदिक तसेच निसर्गोपचारचे अभ्यासक्रम ठेवावेत. नर्सिंगचे कोर्सेसही सुरू करावेत. कोट्यवधीच्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी पारदर्शक निविदा प्रक्रिया राबवावी. सर्व हॉस्पिटलमध्ये ब्लड बँक सुरू कराव्यात. जेणेकरून नागरिक खासगी ब्लड बँकेतून महागड्या रक्त पिशव्या खरेदी करणार नाहीत.
- ॲड. सचिन गोडांबे, भोसरी
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c61993 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..