
हॉकी खेळाडूंच्या प्रशिक्षणासाठी बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शनचा निधीव
पिंपरी, ता. ११ : शहरातील हॉकी खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रशिक्षकांद्वारे प्रशिक्षण मिळण्यासाठी बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी प्रा. लि.ने प्रायोजकत्व स्वीकारले आहे. त्यासाठी २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी सीएसआर उपक्रमांतर्गत २०.४० लाख रुपयांची आर्थिक मदत महापालिकेला देण्याचे जाहीर केले आहे.
याबाबत सोमवारी (ता. ९) शिर्के कंपनीचे सीनियर जनरल मॅनेजर एन. एम. कदम यांनी आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्याकडे पत्र सुपूर्त केले. या वेळी स्मार्ट सिटीचे जनरल मॅनेजर अशोक भालकर उपस्थित होते. औद्योगिकनगरी म्हणून ओळख असलेल्या शहराला भारताचे स्पोर्ट्स हब बनविण्यासाठी महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. महापालिकेने हॉकी खेळासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडीअम उभारले आहे. याठिकाणी शहरातील हॉकी खेळाडूंना स्थानिक स्तरावर आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांद्वारे उत्तम प्रशिक्षण मिळावे, यासाठी दोन ज्युनिअर प्रशिक्षक व दोन सहाय्यक प्रशिक्षकांचा मानधनाचा खर्च उचलणार असून यासाठी महापालिकेला अर्थ सहाय्य देणार असल्याचे पत्रात नमूद केले आहे.
राष्ट्रीय खेळ असलेल्या हॉकीसह विविध आंतरराष्ट्रीय खेळांना प्राधान्य देण्यासाठी पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. शिर्के कंपनीकडून मिळणारे अर्थ साहाय्य हॉकीमधील आगामी तरुणांना प्रशिक्षण देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. शहरात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करण्यावर भर देण्यात येत आहे. शहरातून ऋतुराज गायकवाड, नेमबाज अंजली भागवत, हॉकीपटू धनराज पिल्ले यांसारखे आंतरराष्ट्रीय खेळाडू घडविण्यासाठी औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी केले आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62119 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..