भाजप सत्ता काळातील कामांची चौकशी करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजप सत्ता काळातील कामांची चौकशी करा
भाजप सत्ता काळातील कामांची चौकशी करा

भाजप सत्ता काळातील कामांची चौकशी करा

sakal_logo
By

पिंपरी, ता. १२ : महापालिकेतील भाजपच्या मागील पाच वर्षाच्या सत्ता कार्यकाळातील ज्या मोठ्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाला आहेत, अशा कामांची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याची माहिती कॉंग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
पिंपरी-चिंचवडची निर्मिती माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व दिवंगत नेते अण्णासाहेब मगर यांनी केली. हे शहर औद्योगिकनगरी असल्याने अल्पावधीत या शहराचा भरभराट झाला. एकेकाळी श्रीमंत असलेली महापालिका भाजपने भिकारी केली. या शहरात गुंतवणूक, उद्योग कमी झाले तर त्याचा परिणाम राज्यातील रोजगारावर होतो. त्यामुळे या शहरात मूलभूत सुविधा व्यवस्थित मिळणे महत्त्वाचे आहे. परंतु; ‘भय व भ्रष्टाचार मुक्त महापालिका’ असा नारा देवून सत्तेत आलेल्या भाजपला आंद्रा, भामा आसखेड धरणातून अनुक्रमे १०० व १६७ दशलक्ष लिटरची (एमएलडी) परवानगी मिळूनही भाजपला पिण्याचे पाणी नीट देता आले नाही, असा आरोप लोंढे यांनी केला.
कॉंग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, राष्ट्रीय सचिव पृथ्वीराज साठे, माजी महापौर कविचंद भाट, माजी नगरसेविका निगार बारस्कर, शहर वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्र बनसोडे, एनएसयूआयचे प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे, युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष कौस्तुभ नवले आदी उपस्थित होते.

नेमके कोण पिसळले?
महापालिकेने कुत्र्यांच्या नसबंदीत ७५ कोटी रुपये खर्च केले. पण; शहरातील कुत्री कमी होत नाहीत. कुत्रे जास्त पिसाळलेत की भाजप पिसाळली आहे, असा प्रश्‍न अतुल लोंढे यांनी उपस्थित केला.

‘‘देशात महागाई वाढलेली असताना केंद्रातील भाजप सरकारचे पाच-सहा उद्योजक व व्यापाऱ्यांना हाताशी धरुन लुटण्याचे काम सुरू आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवड महापालिकाही सुटलेली नाही. स्मार्ट सिटीच्या कामात या शहरात १४०० कोटी रुपयांची कामे झाली पण काय स्मार्ट झाले? यात किती भ्रष्टाचार झाला? महापालिकेत निविदांमध्ये बनावट अनामत रक्कम (एफडीआर) मध्ये बोगस धनादेश देऊन भाजपच्या आमदारांनी त्यांच्या लोकांना कामे दिली. कोरोना काळात कोरोना रुग्णालये व खरेदीत घोटाळे केले. या सर्व प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत. आमचे शहराध्यक्ष सविस्तर पत्र देऊन पुरावेही देतील.’’
- अतुल लोंढे, प्रवक्ते, प्रदेश कॉंग्रेस

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62435 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top