आरटीई प्रवेशासाठी दोन वेळा मुदतवाढ देऊनही जागा भरेना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

RTE Admission
आरटीई प्रवेशासाठी दोन वेळा मुदतवाढ देऊनही जागा भरेना

आरटीई प्रवेशासाठी दोन वेळा मुदतवाढ देऊनही जागा भरेना

पिंपरी - शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) (RTE) २५ टक्के प्रवेशासाठी (Admission) निवड यादीतील विद्यार्थ्यांच्या (Students) प्रवेश प्रक्रियेची शेवटची मुदत संपली आहे. परंतु, या प्रवेश प्रक्रियेला दोन वेळा मुदतवाढ देऊनही पहिल्या फेरीतील तब्बल एक हजार ७९ जागा शिल्लक आहेत. त्यामुळे शहरात यंदा विद्यार्थ्यांनी आरटीई प्रवेश प्रक्रियेला प्रतिसाद दिला नसल्याचे चित्र आहे.

शहरात २०२२-२३ या शैक्षणिक वर्षासाठी १७४ शाळांची नोंदणी झाली आहे. त्यात प्रवेश क्षमता एकूण तीन हजार २५५ इतकी आहे. १० हजारावर विद्यार्थ्यांचे ऑनलाइन अर्ज आले होते. त्यामध्ये यंदा आरटीईअंतर्गत शहरात तीन हजार २५५ जागा भरण्यात येणार आहेत. त्यामधील पहिल्या फेरी विद्यार्थ्यांची निवड यादी लावण्यात आली होती. त्यातील शेवटच्या दिवसापर्यंत दोन हजार २३ जागांवर प्रवेश निश्‍चित झाला आहे. अद्यापही पहिल्या फेरीत पूर्णतः प्रवेश झाला नसल्याचे दिसते.

दोन वेळा मुदतवाढ

दरम्यान, चालू शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रियेची ऑनलाइन सोडत ३० मार्चला काढण्यात आली. त्यानंतर चार एप्रिलला आरटीईच्या पोर्टलवर निवड व प्रतीक्षा यादी घोषित करण्यात आली. या विद्यार्थ्यांना २० एप्रिलपर्यंत प्रवेश घेण्यासंदर्भात मुदत देण्यात आली होती. मात्र, यादीतील निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी शिक्षण संचालनालयाला प्रवेश घेण्यासाठी आणखीन मुदतवाढ देण्याची विनंती केली होती. त्यानंतर शिक्षण विभागाने प्रवेश प्रक्रियेसाठी २९ एप्रिल व पुन्हा १० मेपर्यंत मुदतवाढ दिली. तरीही प्रवेश घेण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामध्ये पालकांच्या पसंतीच्या शाळेमध्ये प्रवेश जाहीर न झाल्याने प्रवेश घेण्याकडे पाठ फिरविली जात आहे. कागदपत्रांच्या अडचणींमुळे अनेक पालकांना प्रवेश घेताना अडथळे निर्माण होत आहेत.

पालक अनुत्सुक

एकीकडे मोठ्या शाळांमधील आरटीई प्रवेश सहज होत असताना दुसरीकडे इतर शाळांमध्ये प्रवेशनिश्चिती करण्यासाठी पालक फारसे उत्सुक नसल्याचे दिसत आहेत. त्यामुळे आरटीई प्रवेश संथगतीने होत असल्याचे मत अधिकारी व्यक्त करीत आहेत. यंदा प्रवेशासाठी अर्ज ही मोठ्या प्रमाणावर आले, तर प्रवेश निश्चितीकडे पालक पाठ फिरवीत आहेत. दुसऱ्यांदा मुदतवाढ देऊनही एक हजार ७९ जागांवर प्रवेश झाले नाहीत. पालकांना हव्या त्या शाळांत प्रवेश मिळत नसल्याने व बनावट अर्ज, प्रमाणपत्रे सादर केल्याची प्रकरणे समोर आल्याने जागा रिक्त राहत असल्याची माहिती समन्वयक देत आहेत.

आता मुदतवाढ नको

सोडतीतील प्रवेशांना मुदतवाढ दिल्याने प्रतीक्षा यादीतील विद्यार्थीही प्रवेशासाठी ताटकळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी द्या पहिल्या सोडतीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आतापर्यंत दोन वेळा मुदतवाढ देऊन प्रवेशाची संधी देण्यात आली. प्रवेशप्रक्रिया वेळेवर संपवायची असेल तर आता तिसऱ्यांदा मुदतवाढ न देता प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी द्या, अशी मागणी पालक शरण शिंगे यांनी केली आहे.

केंद्र शाळा एकूण प्रवेश दिलेले प्रवेश रिजेक्ट शिल्लक प्रवेश

आकुर्डी ११० २१६९ १३८३ ९१ ६९५

पिंपरी ६४ १०८६ ६४० ६३ ३८४

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62449 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :educationRTEAdmission
go to top