
पिंपरी : एचआयव्ही बाधितांच्या संगोपन अर्थसाह्यात वाढ
पिंपरी - एच. आय. व्ही. बाधित मुलांचा (HIV Affected Children) सांभाळ करणाऱ्या संस्थेला (Organization) अथवा पालकांना (Parents) महापालिकेकडून (Municipal) देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यामध्ये (Funding) वाढ करण्यात आली आहे. या योजनेच्या सुधारित प्रस्तावास प्रशासक राजेश पाटील (Rajesh Patil) यांनी नुकतीच मान्यता दिली आहे.
महापालिकेच्या समाज विकास विभागामार्फत विविध घटकांसाठी योजना राबवल्या जातात. यातील काही योजनांमध्ये कालानुरूप बदल करण्यात आला आहे. एच.आय.व्ही. बाधितांचा सांभाळ करणाऱ्या पालकांना अथवा संस्थांना महापालिका अर्थसाहाय्य करीत आली आहे. यासाठी विहित अटी-शर्ती निश्चित करण्यात आल्या होत्या. यातील काही अटी- शर्ती आणि लाभाच्या स्वरूपामध्ये बदल करण्यात आला आहे.
एच. आय. व्ही. बाधित रुग्णांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य बळकट होण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या रुग्णांचे शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी त्यांना संतुलित आणि पोषक आहाराची आवश्यकता असते. या आहारासाठी महापालिका दरमहा अर्थसाहाय्य करते.
महापालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या या योजनेचा महापालिका हद्दीतील ० ते १८ वर्षे वयोगटातील एच. आय. व्ही बाधित रुग्ण सांभाळणाऱ्या संस्थेला अथवा पालकांना हे अर्थसाहाय्य मिळत होते. आता या अटींमध्ये बदल करण्यात आला आहे. बाधित रुग्णांच्या वयोगटात वाढ करण्यात आली असून आता ० ते २१ वर्षे वयोगटातील एच. आय. व्ही. बाधित रुग्ण सांभाळणाऱ्या संस्थेला अथवा पालकांनाही आता अर्थसाहाय्य मिळणार आहे. पूर्वी दरमहा अडीच हजार रुपये अर्थसाहाय्य मिळत होते, त्यात दरमहा पाचशे रुपयांची वाढ करून आता तीन हजार रुपये इतके अर्थसाहाय्य केले जाणार आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने अर्जासमवेत महापालिका हद्दीतील स्वत:चे आधारकार्ड जोडणे आवश्यक आहे. यासोबत पालकांचे मतदार ओळखपत्र किंवा मतदार यादीची प्रत सोबत जोडणे गरजेचे आहे. संस्थेचे ‘सार्वजनिक विश्वस्त कायदा’ अथवा ‘संस्था नोंदणी अधिनियम १९६०’ नुसार नोंदणीकृत असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक असून, पाल्य एच. आय. व्ही. बाधित असल्याचे शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा एआरटी कार्डची प्रत सोबत असणे बंधनकारक आहे. तसेच पाल्याचा वयाचा पुरावा सोबत जोडणे अनिवार्य आहे. या योजनेचा गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62616 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..