
पिंपरीतील फुलबाजारात वीज, पाणी, रस्त्याची समस्या
पिंपरी, ता. १२ : मोरवाडी चौकातून पिंपरी उड्डाणपुलाकडे जाताना डाव्या बाजूला महापालिकेच्या रिकाम्या जागेत दोन वर्षापूर्वी घाऊक फूल बाजार सुरू झाला आहे. मात्र, स्वतंत्र वीज पुरवठा, स्वच्छतागृह, डांबरी रस्ता व शेड नसल्याने विक्रेत्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. येथे घाऊक खरेदी व विक्रीसाठी शहर परिसरालगतच्या ग्रामीण भागासह मावळ, खेड तालुक्यातील शेतकरी व किरकोळ विक्रेते येतात.
या बाजाराला ऑगस्ट महिन्यात दोन वर्ष पूर्ण होतील. येथे २७ विक्रेते आहेत. सकाळी आठ ते दुपारी दोन या वेळेत बाजार भरतो. विक्रेत्यांना वजन काटा व इतर बाबींसाठी वीजेची आवश्यकता असते. तसेच, रस्त्यावरही सकाळी विद्युत दिवे नसल्याने विक्रेत्यांना अंधारात सामानाची ने-आण करावी लागते. बाजारासाठी स्वतंत्र जोडण्या द्याव्यात अशी अनेक वेळा मागणी करूनही ती पूर्ण झालेली नाही. याशिवाय स्वतंत्र शौचालय, स्वच्छतागृह नसल्याने कुचंबणा होते. पाण्याची असुविधा असल्याने फुले सुकून जातात. पाण्यासाठीही स्वतंत्र व्यवस्था हवी, असे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.
--
ह प्रभाग क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना आम्ही समस्यांविषयी निवेदन दिले आहे. मागण्या अगदी किरकोळ आहेत, तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. फूल बाजारापर्यंत रस्ता नसल्याने धूळ आणि पावसाळ्यात चिखलाचा सामना करावा लागत आहे.
- राजकुमार मोरे, अध्यक्ष, फूल बाजार
--
जेव्हा निविदा निघतील तेव्हाच तो रस्ता होणार आहे. स्वतंत्र असे काम करता येणार नाही. तसेच, इतर कामे विद्युत विभागाची आहेत. स्वच्छतागृह उड्डाणपुलाखाली आहे. त्याचाच वापर त्यांनी करावा.
- महेंद्र देवरे, ह प्रभाग, कनिष्ठ अभियंता
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62637 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..