कोणी ‘बी पॉझिटिव्ह रक्त देईल का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Blood
कोणी ‘बी पॉझिटिव्ह रक्त देईल का?

कोणी ‘बी पॉझिटिव्ह रक्त देईल का?

पिंपरी - महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालय (YCM Hospital) रक्तपेढीमध्ये (Blood bank) ‘बी पॉझिटिव्ह’ ('B' Positive) रक्तगटाचा तुटवडा (Shortage) जाणवत आहे. रक्तदात्यांचे प्रमाण घटल्याने रक्तपेढीला अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

रक्तपेढीला ‘सकाळ’ प्रतिनिधीने प्रत्यक्ष भेट दिली. या पाहणीमध्ये प्रामुख्याने ‘बी पॉझिटिव्ह’ रक्तगटाचा तुटवडा जास्त प्रमाणात असल्याची माहिती समोर आली. ‘बी पॉझिटिव्ह’ या गटांचे रक्त तीन दिवसांपासून उपलब्ध नाही. ‘वायसीएम’मध्ये रक्ताची गरज भासणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे. रुग्णांना येथे मोफत रक्त मिळते, पण रक्त मिळाले नाही तर त्या रुग्णांच्या नातेवाइकांना जादा रक्कम देण्याची वेळ येत आहे.

मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी

शहरात मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. डायलिसिससाठी रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज भासत असते. त्यामुळे रक्ताची मागणी वाढत आहे, तसेच थॅलेसिमियाग्रस्त रुग्णांसाठी आठ दिवसांच्या आतील (फ्रेश ब्लड) रक्त लागते. त्यामुळे ते उपलब्ध करून देण्यात अडचणी जाणवत आहे, असे रक्तसंक्रमण अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

पॉझिटिव्ह गटाचा तुटवडा

‘ए’ पॉझिटिव्ह, ‘बी’ पॉझिटिव्ह आणि अन्य पॉझिटिव्ह रक्तगटाच्या रक्ताला नेहमीच मागणी असते. सध्या ‘बी पॉझिटिव्ह’ गटाच्या रक्ताचा तुटवडा जाणवतो आहे. त्यामुळे रक्ताची मागणी करणाऱ्यांना पर्यायी डोनरची मागणी केली जात आहे. रक्तपेढीमध्ये सरासरी १५० ते ३०० रक्त पिशव्यांचा (होल ब्लड) साठा असतो. मात्र, आजच्या तारखेला ‘बी पॉझिटिव्ह’ रक्तगटाचे ३ पिशव्या उपलब्ध आहेत. त्यांचीदेखील बुकिंग झाली आहे. या रक्तगटाचे डोनर सहजासहजी मिळत नाही. पर्यायाने, हे रक्त मिळविण्यात अडचणी जाणवतात. सध्या १०-१५ जणांकडून या रक्तासाठी मागणी येत आहे. त्या तुलनेत ४ - ५ डोनर मिळत आहेत.

रक्तदानास नातेवाइकांची पाठ

भोसरी येथील एक ५० वर्षीय व्यक्ती ॲनिमियामुळे चार दिवसांपासून ‘वायसीएम’मध्ये दाखल आहे. त्याला ‘बी पॉझिटिव्ह’ रक्ताची गरज आहे. त्यासाठी त्यांचा मुलगा दोन दिवसांपासून वायसीएम रक्तपेढ्यांमध्ये फेऱ्या मारत आहे. रक्त मिळविण्यासाठी अनेक राजकीय दबाव त्याने आणला. मात्र, त्याला रक्त मिळाले नाही. रक्तपेढीत ‘बी पॉझिटिव्ह’ रक्त नसल्याने त्याला रक्त पिशवी देण्यास अडचण आल्याने अधिकाऱ्यांनी त्याला स्वतःला रक्तदान करण्यास सांगितले, पण तो तयार होईना. अनेक प्रयत्नानंतर तो तयार झाला. सद्यस्थितीला रक्ताचे नातेदेखील रक्तदान करण्यास तयार नसल्याचे दिसून आले.

यशवंतराव चव्हाण रुग्णालयाच्या रक्तपेढीत सध्या काही रक्तगटाच्या रक्ताचा तुटवडा आहे. रक्तदाते सध्या उपलब्ध होत नसल्याने रक्तदानाचे प्रमाण घटले आहे. परिणामी, रक्ताचा काही प्रमाणात तुटवडा भासतो आहे, परंतु रुग्णांची गैरसोय होऊ देत नाही. अन्य रक्तपेढ्यांकडून रक्ताची सोय करण्यात येते.

- डॉ. शंकर मोसलगी, रक्त संक्रमण अधिकारी, यशवंतराव चव्हाण रुग्णालय

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62684 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top