पिंपरी महापालिकेत तृतीयपंथीयांचा पहिला बचत गट स्थापन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PCMC
पिंपरी महापालिकेत तृतीयपंथीयांचा पहिला बचत गट स्थापन

पिंपरी महापालिकेत तृतीयपंथीयांचा पहिला बचत गट स्थापन

पिंपरी - समाजापासून दुर्लक्षित राहिलेल्या तृतीयपंथीयांना (Eunuch) मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने (Pimpri Chinchwad Municipal) सामाजिक क्रांतीचे दमदार पाऊल उचलले आहे. ज्येष्ठ व्यक्तींना पेन्शन (Pension) सुरु केली आहेच, शिवाय इतरांच्या सक्षमीकरणासाठी त्यांचा बचत गट स्थापन केला आहे. गटाचे नाव ‘आधार’ (Aadhar) ठेवले असून उद्यानातील देखभाल-दुरुस्तीच्या कामकाजाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली आहे.

वयाची ५० वर्षे पूर्ण झालेल्या आणि महापालिका हद्दीतील रहिवासी असणाऱ्या तृतीयपंथीय व्यक्तींना आर्थिक मदत म्हणून दरमहा ३ हजार रुपये पेन्शन स्वरूपात देण्यात येणार आहेत. त्यासाठी बॅंक खाते व नोंदणी क्रमांक त्यांना दिला जाणार आहे. तसेच या घटकाच्या कौशल्य विकास, वैद्यकीय मदत व शिक्षणासाठी २५ लाखांची तरतूद केली आहे. त्याव्यतिरिक्त प्रत्येक विभागाने होणारा खर्च स्वतंत्रपणे उचलावयाचा आहे. शासनाचे ओळखपत्र असलेल्या तृतीयपंथीयांनाच याचा लाभ दिला जाणार आहे. यासाठी आधारकार्ड व मतदानाचे ओळखपत्र आवश्यक आहे.

प्राथमिक टप्प्यावर चार बचत गट स्थापन केले आहेत. त्यासाठी तृतीयपंथीयांकडून कागदपत्रे मागविली जात आहेत. आधारकार्ड व ओळखपत्र असल्यानंतर त्यांना बॅंकेत खाते काढून मिळणार आहे. सध्या आधार बचत गटाचे १५ सभासद झाले आहेत. इतर तीन गट तयार करण्याचे काम सुरु आहे. तसेच, उद्यानाच्या देखभाल-दुरुस्तीमध्ये त्यांना चौरस फुटाप्रमाणे कामाचा मोबदला दिला जाणार आहे. दापोडीतील गौतमबुद्ध व चिंचवड लिंक रोडजवळच्या ऑक्सिजन पार्कमधील साफसफाई, झाडांसाठी आळे तयार करणे, पाणी देणे आदी स्वरुपाची कामे दिली जाणार आहेत.

भीक मागूनच उदरनिर्वाह करणाऱ्या या घटकालाही सन्मानाने जगण्याचा हक्क आहे. यातूनच गुन्हेगारी तसेच रुढी-परंपरा त्यांचा पाठलाग सोडायला तयार नाहीत. बरेच तृतीयपंथीय हे उच्चशिक्षित आहेत. त्यांना योग्य दिशा देण्याची गरज आहे. त्यासाठी महापालिकेचे त्यांच्यासाठीचे हे पहिले पाऊल आहे. बचतगटाच्या माध्यमातून आर्थिक सक्षमता येईल. त्याचबरोबर महापालिकेतील विविध विभागांच्या ठिकाणी लवकरच त्यांची नेमणूकही केली जाणार आहे.

- अजय चारठाणकर, उपायुक्त, समाजविकास विभाग

रूग्णालयात स्वतंत्र वॉर्ड

या समाजासाठी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात लवकरच स्वतंत्र वॉर्ड स्थापन होणार आहे. शिवाय त्यांची कुचंबणा टाळण्यासाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारले जाणार आहे. तसेच सुरक्षा पथकातही त्यांना काम दिले जाणार आहे. अशा प्रकारे आणखी विविध ठिकाणी त्यांच्या कामकाजाचे विभाजन केले जाणार आहे.

तृतीयपंथीय आकडेवारी

  • सामाजिक संस्था : १० ते १२

  • व्यक्ति : सुमारे तीन हजार

एचआयव्ही रुग्णांना मी मदत करतो. महापालिकेने नुसतीच प्रक्रिया केली आहे. अद्याप अंमलबजावणी झाली नाही. आम्हाला कंत्राटी तत्त्वावर काम नको आहे. पूर्णवेळ नोकरी हवी. पंधरा ते वीस हजार रुपयांत काही होणार नाही. महागाई वाढली आहे. महापालिकेची प्रसिद्धी होण्यासाठी केवळ हे काम नकोय. खऱ्या अर्थाने आमच्या घटकांसाठी काम होण्याची गरज आहे. आम्ही प्रशिक्षणासाठी जास्त वेळ देवू शकत नाही. त्याकाळात पोट कसे भरणार. आमचे आम्हीच प्रशिक्षण घेवू शकतो. महापालिकेने सामंजस्याची भूमिका घ्यायला हवी. आम्हाला स्वतंत्र स्वच्छतागृह तसेच सोयीसुविधा हव्या आहेत.

- दलजित सिंग, अध्यक्ष, तृतीयपंथी, आधार संस्था

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62729 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top