मैलाशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित न करणाऱ्या मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांनी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मैलाशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित न करणाऱ्या मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांनी
मैलाशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित न करणाऱ्या मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांनी

मैलाशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित न करणाऱ्या मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांनी

sakal_logo
By

मैलाशुद्धीकरण प्रकल्प न केल्यास कारवाई

प्रशासक राजेश पाटील यांचा इशारा; महिन्याभरात कार्यवाही करण्याच्या सूचना

पिंपरी, ता. १५ ः मैलाशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित न करणाऱ्या मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांनी एक महिन्याच्या आत कायमस्वरूपी मैलाशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित करावा अन्यथा अशा सोसायट्यांवर महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापालिका प्रशासक राजेश पाटील यांनी दिला आहे.
शहरातील वाढते औद्योगिकीकरण, उद्योग व व्यवसायामुळे तसेच शहराची वाढती लोकसंख्या आणि नागरीकरणामुळे देखील जलप्रदुषणामध्ये वाढ होत आहे. हे प्रदूषण कमी करण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असून, सर्वांनी त्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी मोठ्या गृहनिर्माण संस्था आणि सोसायट्यांमध्ये मैलाशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित असणे आवश्यक आहे. महावितरणकडून मैलाशुद्धीकरण प्रकल्पासाठी सवलत देण्यात आली आहे. महापालिकादेखील प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी प्रोत्साहन देत असते. महापालिकेच्या वतीने काही सोसायट्यांना मैलाशुद्धीकरण केंद्र सुरू ठेवण्याबाबत वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु अजूनही बऱ्याच ठिकाणी ते सुरू झाले नाही. बागकाम, रस्ते साफसफाई, फ्लशिंग, गाड्या धुणे, तसेच पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त वापरासाठी पाण्याचा पुनर्वापर होताना दिसून येत नाही. यामुळे शहरातील पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यावर परिणाम होत आहे.
मोठ्या हाउसिंग कॉम्प्लेक्स आणि गृहनिर्माण सोसायट्यांमधील एस. टी. पी. अथवा ई. टी. पी. प्रकल्प कायमस्वरूपी कार्यान्वित ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी तपासणी आणि समन्वय पथकाची नियुक्ती आयुक्त पाटील यांनी केली आहे. पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे उपअभियंता नरेश जाधव, जलनि:सारण विभागाचे उपअभियंता विजय सोनवणे, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता अभय कुलकर्णी आणि बांधकाम परवानगी विभागाचे उपअभियंता दीपक कर्पे यांचा या पथकात समावेश आहे. एस. टी. पी. अथवा ई. टी. पी. प्रकल्प कायमस्वरूपी कार्यान्वित ठेवण्यासाठी तांत्रिक मदत करणे, अनधिकृत ड्रेनेज कनेक्शन वर नियमाधीन कारवाई करणे, प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी प्रोत्साहन देणे, दंडात्मक कारवाई करणे अशी जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

अशी होणार कार्यवाही
- ज्या मोठ्या गृहनिर्माण संस्था सोसायट्यांमध्ये कायमस्वरूपी मैलाशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित करून प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर होत नाही. अशा सोसायट्यांची महापालिकेमार्फत तपासणी करण्यात येणार
- मैलाशुद्धीकरण केंद्र बंद असलेल्या सोसायट्यांना देखभाल दुरुस्ती करणाऱ्या खासगी एजन्सीविषयी माहिती दिली जाईल
- महावितरणकडून मैलाशुद्धीकरण प्रकल्पासाठी असणाऱ्या सवलतींची माहिती देणार
- प्रकल्पांतर्गत प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्याबाबत प्रोत्साहन देणार
- मैलाशुद्धीकरणाची वाहिनी जोडलेले अनधिकृत जोड बंद करण्याबाबत सोसायट्यांना महापालिकेच्या वतीने नोटीस देऊन कारवाई करण्यात येईल.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c62845 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top