
गुन्हे वृत्त
पोलिसाला कानाखाली मारल्याप्रकरणी एकाला अटक
पिंपरी, ता. १३ : पोलिस कर्मचाऱ्याच्या कानाखाली मारून शिवीगाळ केल्याप्रकरणी एकाला अटक केली आहे. हा प्रकार देहूगाव येथील माळवाडी येथे घडला.
मारुती दिनकर मुंडे (वय ३५, रा. कृष्ण मंदिराजवळ, माळवाडी, देहूगाव) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले कॉन्स्टेबल अशोक वसंत गोरखे यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे गस्तीवर असताना आरोपी हा त्याच्या पत्नीला झाडाच्या फांदीने मारहाण करीत असल्याचा कॉल आला. त्यामुळे फिर्यादी तेथे पोहोचले . आरोपीला विचारपूस करीत असताना त्याने ‘तू कोण विचारणार मला’ असे म्हणत फिर्यादीला मारण्यासाठी दगड घेऊन धावत आला. दरम्यान, पोलिस नाईक कोंडलकर यांनी मागून पकडले असता त्यांना धक्का मारून फिर्यादीस कानाखाली मारली. शिवीगाळ करीत सरकारी कामात अडथळा आणला.
एक लाखांची फसवणूक
पिंपरी, ता. १३ : मुलीच्या लग्नात झालेला खर्च तिच्या सासरच्या लोकांकडून तडजोड करून मिळवून देण्याच्या बहाण्याने एका महिलेने एक लाखाची फसवणूक केली. हा प्रकार आळंदी, देहूफाटा येथे घडला. अल्पना पवार (रा. शनीनगर, आंबेगाव खुर्द, पुणे) या महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी भागवत भीमराव सोमवंशी (रा. देहूफाटा, आळंदी) यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या मुलीच्या लग्नात झालेला खर्च मुलीच्या सासरच्या मंडळींकडून तडजोडीच्या माध्यमातून अजिंक्य महिला तक्रार निवारण केंद्र या संस्थेमार्फत मिळवून देते, असे आरोपीने फिर्यादी यांना सांगितले. त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून एनईएफटीद्वारे एक लाख रुपये स्वीकारले. मात्र, काम पूर्ण न करता टाळाटाळ करून घेतलेले पैसे परत न देता फसवणूक केली.
देहूरोडमध्ये तरुणावर कोयत्याने वार
पिंपरी, ता. १३ : ‘माझ्याकडे का बघतो’ असे म्हणत एकाने तरुणावर कोयत्याने वार केले. यात तरुण जखमी झाला. ही घटना देहूरोडमधील एमबी कॅम्प येथे घडली. कन्हैया संपत कन्नप्पा (वय २२, रा. एमबी कॅम्प, देहूरोड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रोहित टेका ऊर्फ राजा स्वामी (रा. एमबी कॅम्प, देहूरोड) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. एमबी कॅम्प येथील सार्वजनिक स्वच्छतागृहाबाहेर फिर्यादी थांबले होते. त्यावेळी माझ्याकडे का पाहतो, असे म्हणत आरोपी स्वामी याने फिर्यादीला शिवीगाळ करून लाथाबुक्क्याने मारहाण केली. मी तुझ्याकडे पाहिले नाही, असे फिर्यादी सांगत असताना आरोपी स्वामीने त्यांच्यावर कोयत्याने वार केले.
मारहाण व विनयभंग प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
‘तू भाडेकरू आहे. एवढा रुबाब का दाखवतो, असे म्हणत दोघा भावांनी एका महिलेला व तिच्या दोन मुलांना मारहाण केली. तसेच महिलेचा विनयभंग केला. ही घटना थेरगाव येथे घडली. सचिन आडसूळ (वय ३५), राजेश आडसूळ (वय २८, दोघे रा. दगडू पाटीलनगर, थेरगाव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी सचिन हा घरासमोर दारू पीत बसला होता. त्यावेळी महिलेचा मोठा मुलगा व सचिन यांचे भांडण झाले. हे भांडण सोडविण्यासाठी महिलेचा लहान मुलगा गेला. त्यावेळी आरोपी सचिनने दोघांना मारहाण केली. त्यानंतर मोठा मुलगा पोलिस चौकीत तक्रार देण्यासाठी गेला. त्यावेळी राजेश आला. माझ्या भावाला दोघांनी मारले आहे. तू त्यांना घराबाहेर काढ. त्यावर महिलेने नाही म्हटले असता आरोपी राजेश याने महिलेला मारहाण केली. त्यांच्याशी गैरवर्तन करून त्यांचा विनयभंग केला. दरम्यान, फिर्यादीचा भाऊ मध्ये पडला असता त्यालाही दांडक्याने मारहाण केली.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63011 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..