
बॉम्बसदृश्य वस्तु आढळल्याने उडाला गोंधळ संशयित वस्तू ‘बी. जे.’ च्या मैदानात नेऊन केली निकामी
पुणे, ता. १३ : पुणे रेल्वे स्थानकावर शुक्रवारी सकाळी बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याने मोठा गोंधळ उडाला. मात्र, कडक पोलिस बंदोबस्तात पुणे पोलिसांच्या बॉम्बशोधक व नाशक पथकाच्या (बीडीडीएस) पाहणीत संबंधित वस्तू बॉम्ब नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांसह प्रवासी, नागरिकांचाही जीव भांड्यात पडला. त्यानंतर पथकाने ही वस्तू बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानात नेऊन निकामी केली. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण होऊन, रेल्वेसेवाही काही काळ विस्कळित झाली होती.
पुणे पोलिस व लोहमार्ग पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला शुक्रवारी सकाळी पावणेअकरा वाजता पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्ब ठेवल्याची खबर मिळाली. त्याचवेळी तेथील महिला स्वच्छता कर्मचारी व इलेक्ट्रिक वाहनचालक यांनीही या बाबत रेल्वे प्रशासनाला माहिती दिली. त्यानंतर बंडगार्डन पोलिस ठाणे, पुणे पोलिसांच्या विशेष शाखा व लोहमार्ग पोलिसांना माहिती देऊन बीडीडीएस पथकाला पाचारण करण्यात आले. तोपर्यंत बंडगार्डन पोलिस, पुणे विभागीय लोहमार्ग पोलिस, रेल्वे पोलिस दल, अग्निशामक दलाचे अधिकारी, जवान घटनास्थळी दाखल झाले. रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकजवळील आरक्षण केंद्राजवळ बॉम्बसदृश्य वस्तू ठेवलेला परिसर पोलिसांनी मोकळा केला.
‘बीडीडीएस’चे पोलिस निरीक्षक प्रभाकर ढगे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर, त्यांनी प्रारंभी विराट व टायसन या दोन श्वानांकडून या वस्तूची तपासणी केली. त्यावेळी दोन्ही श्वानांकडून स्फोटके नसल्याचा इशारा देण्यात आला. त्यानंतर पथकाने त्यांच्याकडील अद्ययावत यंत्रांनीही तपासणी केली, त्यामध्येही स्फोटक नसल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी तत्काळ घटनास्थळाची पाहणी केली. तर लोहमार्ग विभागाचे पोलिस अधीक्षक सदानंद वायसे यांनीही संबंधित ठिकाणी बॉम्बसदृश्य वस्तू नव्हे, तर फटाके असल्याचे सांगितले.
नेमके होते तरी काय?
पुठ्ठ्याच्या स्वरुपातील तीन नळकांड्या घटनास्थळी आढळून आल्या. त्यामध्ये फटाक्यांची दारू व त्याला वायर जोडण्याचा प्रयत्न केला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात, तपास सुरू
रेल्वे स्थानक परिसरात बॉम्बसदृश्य वस्तू ठेवण्याचा प्रकार एका व्यक्तीने केला असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यादृष्टीने लोहमार्ग पोलिसांकडून रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेऊन तपास केला जात आहे. याबरोबरच बंडगार्डन पोलिस, गुन्हे शाखेच्या पोलिसांकडूनही या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन तपास सुरू केला आहे.
पुणे रेल्वे स्थानकावर जिलेटिनसदृश्य वस्तू आढळल्या, त्याची तपासणी केल्यानंतर ती स्फोटके नसल्याचे उघड झाले. संबंधित घटना ही घातपाताचा प्रकार नाही. या प्रकरणाचा पुणे पोलिस व रेल्वे पोलिस योग्य पद्धतीने तपास करतील.
- अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63118 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..