चार जिल्ह्यातील पाच रक्तपेढ्यांचे परवाने रद्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चार जिल्ह्यातील पाच रक्तपेढ्यांचे परवाने रद्द
चार जिल्ह्यातील पाच रक्तपेढ्यांचे परवाने रद्द

चार जिल्ह्यातील पाच रक्तपेढ्यांचे परवाने रद्द

sakal_logo
By

पिंपरी, ता. १३ : अन्न व औषध परवाना विभागाने १ मार्च ते ३१ एप्रिल या कालावधीत पुणे परिक्षेत्र अंतर्गत केलेल्या पाहणीत ३४ रक्तपेढ्या दोषी आढळल्या आहेत. यातील पाच पेढ्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले आहेत. रक्तसंक्रमण अधिकारी नसताना रक्त काढणे, टेक्निशियनलाच रक्त भरण्याचा किंवा काढण्याचा सल्ला देणे, रक्ताचे तापमान संतुलित न ठेवणे, संकेतस्थळावर रक्ताचा साठा न दर्शविणे, रक्ताच्या नोंदी विहित स्वरूपात न ठेवणे... अशी विविध कारणे पाहणीवेळी निदर्शनास आली आहेत.

अन्न व औषध विभागाने १ मार्च ते ३१ एप्रिल या कालावधीत रक्तपेढ्यांची पाहणी केली. कोरोना काळापासून रक्तपेढ्यांविरोधात सातत्याने तक्रारी वाढत होत्या. थॅलसेमियाच्या रुग्णांना रक्त न देणे, त्यांच्याकडून प्रक्रिया शुल्क घेणे, तसेच प्लाझ्मा रक्त पिशवीसाठी विहित रकमेपेक्षा अवाजवी रक्कम आकारणे अशा आशयाच्या तक्रारी खासगीसह शासकीय रक्तपेढ्यांविषयी होत्या. यानंतर केलेल्या पाहणीत गलथान कारभार समोर आला. राज्यात अशाप्रकारे गैरप्रकार करणाऱ्या रक्तपेढ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

रक्त व प्लाझ्मा तसेच प्रक्रियेसाठी राष्ट्रीय, राज्य संक्रमण परिषदेकडून विहित केलेल्या दरापेक्षा अवाजवी रक्कम आकारणाऱ्या खासगी रक्तपेढ्यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. या कारवाईसाठी राज्य रक्त संक्रमण संचालक यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित केले होते. राष्ट्रीय रक्त संक्रमण परिषद, राज्य रक्त संक्रमण परिषद तसेच शासन यांनी विहित केलेल्या प्रक्रिया शुल्कापेक्षा जादा आकारलेल्या प्रक्रिया शुल्काच्या पाचपट दंड केला करण्याचे आदेश दिले होते. यापैकी जादा आकारण्यात आलेले शुल्क रुग्णास परत करण्यात येणार असून उर्वरित रक्कम राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. दंडात्मक कारवाईपूर्वी नोटीस देऊन त्यांचे म्हणणे मांडण्याची एक संधीही त्यांना देण्यात येत आहे. तरीही वारंवार मार्गदर्शक तत्त्वे, सूचनांचे उल्लंघन केले गेल्यास, अशा रक्तपेढ्यांचे परवाने रद्द करण्याबाबतचे आदेश अन्न व औषध प्रशासन विभागाला देण्यात आले आहेत.
--
रक्तसंकलन करण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तीच हवी. तसेच, रक्तदान शिबिर देखील तज्ज्ञ मार्गदर्शकांकडूनच भरविणे आवश्यक आहे. शिबिरे भरविताना सामाजिक संस्थाबरोबर भेटवस्तूंचे वाटप करणे हे नियमाविरुद्ध आहे. एखाद्याला प्रलोभने दाखवून रक्तदान करण्यासाठी आकर्षित करु नये.
- एस.बी.पाटील, सहायक आयुक्त, अन्न व औषध विभाग, पुणे
---
पुणे अन्न व औषध परिक्षेत्र
खासगी व शासकीय रक्तपेढ्यांची तपासणी : ९६
कारणे दाखवा नोटीसा : १७
रक्तपेढ्यांचे परवाने तात्पुरते निलंबित : १०
परवाने कायमस्वरुपी रद्द : ५
कारवाई स्थगित केलेल्या : २
---
यांचे केले परवाने रद्द -
महात्मा गांधी रक्तपेढी, कोल्हापूर
मल्लिकार्जून रक्तपेढी, सोलापूर
पंढरपूर रक्तपेढी, पंढरपूर
महालक्ष्मी रक्तपेढी, कऱ्हाड सातारा
आदर्श रक्तपेढी, सांगली

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63162 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top