
तलावातील मृत्यूची चौकशी करण्याची पालकांची मागणी
मुलाच्या मृत्यूच्या चौकशीची वडिलांची मागणी
पिंपरी, ता.१५ ः आकुर्डी येथील छत्रपती शिवाजी महाराज तरण तलावात मित्रांसोबत पोहायला गेलेल्या अभियांत्रिकीच्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. या बाबत तरुणाच्या वडिलांनी निगडी पोलिसांना निवेदन दिले आहे. ‘माझ्या मुलाला आणि कुटुंबीयांना न्याय द्या,’ अशी मागणी विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलिसांकडे केली आहे.
कृष्णा क्षीरसागर (वय १९, रा. बॉईज हॉस्टेल, निगडी. मूळ रा. नांदेड) असे तरण तलावात बुडालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. या प्रकरणी शिवाजी माणिकराव क्षीरसागर यांनी निगडी पोलिस ठाण्यात निवेदन दिले आहे. कृष्णा आकुर्डी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता. आठ मे रोजी सकाळी तो त्याच्या मित्रांसोबत आकुर्डी येथील छत्रपती शिवाजी महाराज तरण तलाव येथे पोहण्यासाठी गेला. तरण तलावात पोहत असताना बराच वेळ झाला तरी कृष्णा पाण्याच्या बाहेर आला नाही. त्यामुळे त्याचा शोध घेतला आणि तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच कृष्णाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
कृष्णाचा मृत्यू हा संशयास्पद असल्याचे त्याच्या वडिलांचे मत आहे. ‘माझा मुलगा पिंपरी-चिंचवडमध्ये शिकत होता. आठ मे रोजी सकाळी ८.२० ला त्याचा आकुर्डीतील छत्रपती शिवाजी महाराज तरण तलावात संशयास्पद मृत्यू झाला आहे. पोलिसांनी याचा सखोल तपास करून माझ्या मुलाला व कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा. जलतरण तलाव, होस्टेल, कॉलेज स्टाफ व मुलांकडे चौकशी करावी,’ असे शिवाजी क्षीरसागर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. निगडी पोलिस तपास करीत आहेत.
क्षमता ६०, तरी १३० जणांना प्रवेश
आकुर्डी जलतरण तलावात तरुण मुलगा पाण्यात बुडून मरण पावला आहे. या तलावाची प्रवेश क्षमता ६० आहे. तरी या ठिकाणी १३० जणांना पोहण्यासाठी सोडण्यात आले होते. गोपनीय चौकशी करावी. तलाव अधिकारी व कर्मचारी विरोधात कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63409 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..