गुन्हे वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हे वृत्त
गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

sakal_logo
By

अल्पवयीन मुलीवर अत्याचार;
निगडीमध्ये एकाला अटक

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. हा प्रकार निगडी येथे घडला. अनिकेत प्रल्हाद पारवे (वय २२, रा. अजंठानगर,निगडी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीने निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. आरोपीने फिर्यादी मुलीशी मैत्री करून लग्नाचे आमिष दाखविले. वेळोवेळी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून मुलीचे अश्लील फोटो काढले. त्यानंतर तिच्या घरी येऊन लग्नाची मागणी घातली असता घरच्यांनी नकार दिला. त्यावेळी आरोपीने पीडित मुलीसह तिच्या घरच्यांना शिवीगाळ केली. मुलीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.

साडेतीन लाखांच्या मालाचा अपहार
एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत पोहोचविण्यासाठी दिलेल्या साडेतीन लाखांच्या मालाचा चालकाने अपहार केला. हा प्रकार देहूगाव व अंबरनाथ येथे घडला. याप्रकरणी विकास निवृत्ती साळुंके (रा. दिघी रोड, भोसरी) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार सोहेल सरफराज खान (वय ३२, रा. रतवाखेडा, आलम गंज खुंटा, फतेहपुर, उत्तर प्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल झाला. आरोपी हा फिर्यादीकडे चालक म्हणून कामाला होता. देहूगाव येथील व्यंकटेश मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्रीज या कंपनीतून चार हजार ९५५ किलो वजनाचे इंडस्ट्रिअल मटेरिअल अंबरनाथ एमआयडीसीमधील एका कंपनीत सोडण्यासाठी आरोपीकडे दिले. दरम्यान, आरोपीने एकूण मालापैकी तीन लाख ४५ हजार रुपये किमतीचा दोन हजार ७४५ किलो वजनाचा माल, १५ हजारांचे डिझेल असा एकूण तीन लाख ६० हजारांचा माल परस्पर विकला. तसेच फिर्यादी यांची गाडी अंबरनाथ पाइपलाइन रस्त्यावर सोडून फियादीचा विश्वासघात केला.

भोसरीत मारहाण करून मोबाईल हिसकावला
मारहाण करून मोबाईल हिसकावल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला. हा प्रकार भोसरी येथे घडला. याप्रकरणी वैभव रामचंद्र बिरादार (रा. क्रांती सूर्यनगर, दिघीरोड, भोसरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार विजय विलास झेंडे व एका अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला. फिर्यादी व त्यांचा मित्र अनिकेत हे भोसरीतील दिघीरोड येथून जात होते. त्यावेळी आरोपींनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यापैकी एकाने फिर्यादी यांचा दहा हजारांचा मोबाईल हिसकावला. तसेच, एका मुलीला लाथ मारून शिवीगाळ केली.

चिंचवडला टोळक्याकडून तरुणाला मारहाण
जुन्या भांडणाच्या कारणावरून सहा जणांच्या टोळक्याने तरुणाला शिवीगाळ व मारहाण केली. हा प्रकार चिंचवड येथे घडला. याप्रकरणी यासीन निसार खान (रा. श्रीराम कॉलनी, चिंतामणी चौक, वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार लक्ष्मीकांत रामचंद्र चलवादी (वय १९, रा. साईनाथनगर, स्पाईन रोड, बिजलीनगर, चिंचवड) याला पोलिसांनी अटक केली. तर विशाल खंडागळे, अथर्व ऊर्फ चण्या शिंदे, ओम गायथळे व दोन अल्पवयीन मुले यांच्यावर गुन्हा दाखल झाला. फिर्यादी हे त्यांच्या घराबाहेर दुचाकीवर बसलेले असताना आरोपी तेथे आले. जुन्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादीला शिवीगाळ करून हाताने मारहाण केली.

जिवे मारण्याची धमकी; जावयावर गुन्हा
सासरी येऊन शिवीगाळ करीत जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जावयावर गुन्हा दाखल झाला. हा प्रकार थेरगाव येथे घडला. याप्रकरणी महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार गंगाधर ऊर्फ नाना महादेव सोनवणे (वय २८, रा. पडवळनगर, थेरगाव) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे आरोपी हा फिर्यादी यांचा जावई आहे. फिर्यादीसह त्यांचा मुलगा स्वप्नील, मुलगी सोनाली व नातू घरी असताना आरोपी त्यांच्या घरी आला. घरासमोरील दुचाकीची तोडफोड करून दरवाजावर लाथा मारल्या. फिर्यादी यांना मारण्यासाठी कोयता उगारला. त्यानंतर स्वप्नील व सोनाली यांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देत आरडाओरडा केला.

सुसगावात महिलेला मारहाण
महिलेला शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
झाला. हा प्रकार सुसगाव येथे घडला. याप्रकरणी पीडित महिलेने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अर्चना भगवान पवार, भगवान नाना पवार, लीलाबाई पोपट मोहिते (रा. सुसगाव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला. भगवान पवार हा विनाकारण फिर्यादीच्या मुलाला शिवीगाळ करीत होता. त्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने भगवान याने फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ केली. तसेच इतर आरोपींनी त्यांना हाताने मारहाण केली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c63438 Txt Pc4

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top