
टँकर माफियांचा वलवण धरणाच्या पाण्यावर रोजच दरोडा
पिंपरी - मावळ तालुक्यातील कार्ला नळ पाणी पुरवठा योजनेसाठी वलवण धरणातील पाण्याचा वापर केला जातो. हे धरण टाटा समूहाच्या टाटा पॉवर या कंपनीचे खासगी धरण आहे. या धरणातील पाझर वरसोली येथे वाहून जाणाऱ्या ओढ्यातून पाणी चोरी टँकर माफिया करतात. तरीही या माफियांवर टाटा पॉवर किंवा जलसंपदा विभाग कारवाई करत नाही. याबाबत त्यांचे मौन कसे काय? हे गौडबंगाल नागरिकांना उमगलेले नाही.
लोणावळा-कार्ला परिसरात गेल्या काही वर्षांपासून अपुरा व अनियमित पाणी पुरवठा होत आहे. कार्ला व पाटण प्रादेशिक पाणी नळ योजना गंजलेली आहे. त्यातच टँकर माफियांसाठी कृत्रिम टंचाई केली जाते. यातूनच कोट्यवधींचा भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप नागरिक करत आहेत. या माफियांना पाणी मिळते कोठून? असा साऱ्यांचा सवाल आहे. त्यामुळे ‘सकाळ’ने याचा शोध घेतला असता धक्कादायक माहिती हाती आली आहे.
पुणे-मुंबई महामार्गावरील वरसोली गाव आहे. तिथे वलवण धरणाच्या पाझरातून ओढा तयार झाला आहे. यातून टँकर माफिया पाणी चोरतात. दिवसभरात सुमारे २०० टँकर भरले जातात. धरण खासगी असले तरी ती नैसर्गिक संपत्ती आहे. तसेच ओढा, नाले, सार्वजनिक तळी यांचाही समावेश अशा संपत्तीतच होतो. मग या संपत्ती चोरी प्रकरणी टाटा पॉवर व जलसंपदा विभाग हे दोन्ही गप्प का? माफियांवर कारवाई का करत नाही? असा सवाल या भागातील नागरिकांचे आहेत.
एखाद्या शेतकऱ्याने इंद्रायणी नदीतून शेतीसाठी पाणी उचलले तर; त्याला रीतसर रॉयल्टी भरावी लागते. न भरल्यास जलसंपदा विभागाकडून कारवाई होते. दंड केला जातो. मग या माफियांना रॉयल्टी न आकारता सूट का दिली जात आहे? असा प्रश्न साहजिकच पडतो. त्यामुळे जलसंपदा विभागाची दररोजची हजारो रुपयांची रॉयल्टी सध्या बुडत आहे, तरीही अधिकाऱ्यांपासून राजकारण्यापर्यंत कोणीही आवाज उठवत नाही, याविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे.
धरणातून पाणी उचलण्यासाठी कोणालाही परवानगी दिलेली नाही. पाणी कोण चोरतेय? त्या भागातील पोलिस निरिक्षक सविस्तर माहिती देतील.
- बसवराज मुन्नोली, अधिकारी, टाटा पॉवर
पाणी विकणाऱ्यांकडून जलसंपदा विभाग कुठलीही रॉयल्टी घेत नाही. उलट असे पाणी चोरून विकले जात असेल, तर त्यांच्याविरोधात कोणीतरी तक्रार केल्यास आम्ही कारवाई करू.
- राजेंद्र धोडपकर, कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग
ग्रामीण भागात सर्वेक्षण होत नाही, हे दुर्दैवी आहे. शहरी भागात दरडोई १३५ ते १५० लिटर पाणी दिले जाते, तर ग्रामीण भागात दरडोई ४० ते ७० लिटर दिले जाते. ग्रामीण भागात आता गरजा वाढल्या आहेत. ग्रामीण भागात पाणी जादा दिले पाहिजे. कार्ला पर्यटन क्षेत्र करायचे असेल तर या भागात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जलवाहिन्या वाढवून क्षमताही वाढविली पाहिजे. दरडोई पाणी जादा दिले पाहिजे तरच या भागात पर्यटकांना, लोकांना, जनावरांना, सर्वांनाच पाणी मिळेल.
- भरत मोरे, माजी सदस्य, जिल्हा परिषद