
पिंपरी : दिवसाला एक डेंगीचा रुग्ण
पिंपरी : सध्या पावसामुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. त्यातच, लहान मुले सर्दी, खोकला व तापाने हैराण झाली आहेत. त्यामुळे आई-वडिलांची मुलांप्रती चिंता अधिक वाढली आहे. डासांच्या उत्पत्तीच्या ठिकाणांपासून त्यांना सतर्क होणे आवश्यक आहे. हलगर्जीपणा झाल्यास डेंगीसारख्या आजाराला सामोरे जाणे कठीण आहे. सध्या वायसीएम रुग्णालयात एक ते १८ जुलैपर्यंत दाखल रुग्णांपैकी पाच ते २० वयोगटामध्ये २९ रुग्णांपैकी १६ रुग्ण डेंगीचे आढळून आले आहेत.
शहरातील अनेक भागांमध्ये पाऊस आणि हवामानातील बदलामुळे डेंगीचे रुग्ण झपाट्याने वाढताना दिसत आहेत. लहान मुले आजारी पडल्यास घरातील वातावरण अस्वस्थ होते. मुले आजारी पडल्यास सर्दी, खोकल्याची औषधे दिली जातात. त्यानेही काही फरक न पडल्यास पालक दवाखाना गाठतात. मुलांची चिडचिड वाढते. अशा वेळी आई-वडिलांचे नियमित गणितच बिघडून जाते. शिवाय, आहाराकडे लक्ष न दिल्यास उलट्या व जुलाबाने मुले हैराण होतात. अशावेळी मुलांना सक्तीने घरातील अन्न देण्यासाठी पालकांची धडपड दिसून येते. बाहेरचे पदार्थ खाण्यात आल्यास आजारांना आमंत्रण मिळत असल्याचे दिसत आहे.
अशी असतात लक्षणे
- ताप १०३ फॅरेनहाइपर्यंत, थंडी
- डोकेदुखी, मळमळ, उलटी
- पांढऱ्या पेशीत घट, अंगदुखी,
- अशक्तपणा, थकवा, सांधे दुखी
- त्वचा, डोळे लाल, जळजळणे
- भूक मरणे, पोट फुगणे, पोटदुखी
डेंगी, मलेरियापासून बचावासाठी
- पाणी उकळून पिणे
- बाहेरील पदार्थ खाणे टाळणे
- डासांपासून संरक्षण करणे
- पाण्यामध्ये अॅबेट, तुरटी टाकणे
- घराचा परिसर स्वच्छ ठेवणे
- तातडीने चाचणी करून घ्यावी
पावसाळ्यात घरांघरात डेंगी आढळून येत आहे. कचऱ्याचा व पाण्याचा निचरा नीट न झाल्यामुळे डासांचा प्रादूर्भाव वाढत आहे. त्यातून डेंगी, मलेरिया सारख्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे, घरांमध्ये पाणी साठवू नये. डबकी साफ असावीत. कुंड्यांच्या प्लेटमधील पाणी नीट काढावे. त्याचबरोबर सांडपाणी उघड्यावर नसू नये. रात्री झोपताना मच्छर टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात. अंगभर कपडे घालावेत.
- डॉ. दीपाली अंबिके, बालरोग तज्ज्ञ, वायसीएम रुग्णालय
गेल्या चार दिवसांपासून मुलगा शाळेतून घरी आहे. आधी सर्दी झाली. ताप वाढल्याने दवाखाना गाठला. त्याला अशक्तपणा प्रचंड आहे. आम्ही दोघेही नोकरीला आहोत. मुलगा आजारी पडल्यामुळे काळजी वाढली आहे. परंतु, प्रत्येक पालकाने मुलगा शाळेत किंवा बाहेर काही खातो का? तसेच, अस्वच्छ ठिकाणांपासून त्यांना दूर ठेवणं गरजेचं आहे. लक्षणे दिसताच उपचार केल्यास परिस्थिती नियंत्रणात आणणे शक्य होते.
- जया साठे, पालक, तळवडे
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d82442 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..