
तुकोबारायांची पालखी स्वगृही!
देहू : ‘ज्ञानोबा-तुकाराम’ असा जयघोष...टाळ मृदंगाचा गजर...अमाप उत्साह...ग्रामस्थांकडून जल्लोषात स्वागत...अशा उत्साही वातावरणात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे दुपारी अडीचच्या सुमारास देहूत आगमन झाले. गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ग्रामस्थांनी आणि भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. माळीनगर येथील ग्रामस्थांनी पालखीच्या स्वागतासाठी फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. मुख्य देऊळवाड्यात आरती झाल्यानंतर संत तुकाराम महाराज पालखी सोहळा विसावला. पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात चैतन्य आले होते.
आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे २० जूनला देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले होते.
पंढरपूरात आषाढी एकादशीला लाखो भाविकांच्या समवेत वारी समर्पित करून संत तुकाराम महाराज पालखी सोहळा परतीचा मार्गे शनिवारी पिंपरी-चिंचवड शहरात मुक्कामी होता. रविवारी सकाळी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा निगडीकडे मार्गस्थ झाला. निगडी येथील खंडोबा मंदिरात पालखीचा विसावा होता. श्री खंडोबा प्रतिष्ठानच्या वतीने पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना खिचडी, केळी वाटप करण्यात आले. देहूरोडमार्गे चिंचोली येथील शनी मंदिरात दुपारी बारा वाजता पालखीचे आगमन झाले. या ठिकाणी संस्थानच्या वतीने अभंग आरती झाली. देहू पंचक्रोशीतील नागरिक पालखीच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते. माळीनगर येथे पालखीच्या स्वागतासाठी फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या होत्या. क्रांतिवीर मित्र मंडळाच्या वतीने फुलांचा वर्षाव करीत पालखीचे स्वागत करण्यात आले.
त्यानंतर पालखीचे बाजारपेठमार्गे देऊळवाड्याकडे मार्गस्थ झाली. संत तुकाराम महाराज जन्मस्थान आणि देऊळवाड्यासमोर आगमन झाल्यानंतर अभंग आरती झाली. पालखीचे देऊळवाड्यात मंदिर प्रदक्षिणा झाल्यानंतर भजनी मंडपात आरती झाली.
या वेळी संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख संतोष महाराज मोरे, विशाल महाराज मोरे, माणिक महाराज मोरे, विश्वस्त संजय महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, अजित महाराज मोरे व इतर उपस्थित होते. पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या सेवेकरी, विणेकऱ्यांचा संस्थानच्या वतीने नारळ प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला.
जोरदार स्वागत
दुपारी अडीचच्या सुमारास टाळमृदंगाच्या गजरात पालखीचे गावाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आगमन झाले. परंपरेनुसार रामचंद्र तुपे कुटुंबाच्या वतीने प्रवेशद्वाराजवळ रथाच्या बैलजोडीस औक्षण करण्यात आले. दहीभाताचा नैवेद्य दाखविण्यात आला. या वेळी प्रवेशद्वाराजवळ आबालवृद्धांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. ग्रामपंचायत कार्यालयाजवळ ग्रामपंचायतीच्या वतीने पालखीचे स्वागत करण्यात आले.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d82739 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..