
सहा प्रभागात लोकसंख्येपेक्षा मतदार अधिक
पिंपरी, ता. २५ ः महापालिका निवडणुकीसाठी २०११ ची लोकसंख्या गृहित धरून प्रभाग रचना केली आहे. मात्र, मतदार संख्या ३१ मे २०२२ पर्यंतची आहे. त्यामुळे १३९ पैकी सहा प्रभागात लोकसंख्येपेक्षा मतदारसंख्या अधिक झाली आहे. तर, दोन प्रभागात लोकसंख्या व मतदार संख्येत सहाशेपेक्षा कमी फरक आहे.
निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने १३९ जागांसाठी होणार आहे. त्यासाठी ४६ प्रभाग निर्माण केले असून अनुसूचित जाती (एससी) व अनुसूचित जमातीसाठी (एसटी) आरक्षण सोडत काढली आहे. आता शुक्रवारी (ता. २९) इतर मागासवर्गीय (ओबीसी), ओबीसी व सर्वसाधारण महिला अशा ७६ जागांसाठी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. त्यानंतर खुल्या ३८ जागा कोणत्या हे स्पष्ट होणार आहे. शिवाय, निवडणूक विभागाने प्रभागनिहाय अंतिम मतदारयाद्या शुक्रवारी (ता. २२) प्रसिद्ध केल्या आहेत. त्यानुसार प्रभागातील लोकसंख्या व मतदारसंख्या निश्चित झाली आहे. कोरोनामुळे २०२१ ची जनगणना न झाल्याने २०११ ची १७ लाख २७ हजार ६९२ लोकसंख्या गृहित धरली आहे. तर, ३१ मेपर्यंत नोंदणी केलेले मतदानासाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे मोरेवस्ती चिखली, बोऱ्हाडेवाडी मोशी, चोविसावाडी चऱ्होली, रावेत-किवळे, वाकड, पिंपळे सौदागर या प्रभागांत लोकसंख्येपेक्षा मतदारसंख्या अधिक दिसत आहे.
फरक असण्याची कारणे
- लोकसंख्या २०११ ची आणि मतदार ३१ मे २०२२ पर्यंतचे
- समाविष्ट गावांत राहायला येणाऱ्यांची संख्या दहा वर्षात वाढली
- समाविष्ट १८ गावांपैकी चिखली, मोशी, चऱ्होली, वाकड, पिंपळे सौदागरमध्ये वाढ
- मोरवाडी, दापोडी प्रभागात नवीन गृहप्रकल्पांमुळे मतदार संख्या वाढली
दृष्टीक्षेपात लोकसंख्या व मतदार
शहरातील अंदाजे लोकसंख्या ः २७,००,०००
निवडणुकीसाठी ग्राह्य लोकसंख्या ः १७,२७,६९२
२०१७ च्या निवडणुकीसाठी मतदार ः ११,९२,०८९
२०२२ च्या निवडणुकीसाठी मतदार ः १४,८८,१२९
सहाशेपेक्षा कमी फरक
प्रभाग १८ मोरवाडी आणि प्रभाग ४३ दापोडीमध्ये लोकसंख्येपेक्षा मतदारांची संख्या अवघी सहाशेपेक्षा कमी आहे. मोरवाडीची लोकसंख्या ३८ हजार २४४ आणि मतदार ३७ हजार ६६१ आहे. तर, दापोडीची लोकसंख्या ३९ हजार २६६ आणि मतदार ३८ हजार ६६९ आहे. दोन्ही प्रभागात लोकसंख्येचा आकडा गाठण्यासाठी अनुक्रमे केवळ ५८३ व ५९७ मतदार कमी आहेत.
लोकसंख्येपेक्षा अधिक मतदार असलेले प्रभाग
प्रभागाचे नाव / क्रमांक / लोकसंख्या / मतदार / फरक (लोकसंख्येपेक्षा मतदार अधिक)
मोरेवस्ती / २ / ३२,१६१ / ३३,०२४ / ८६३
बोऱ्हाडेवाडी / ३ / ३६,७१८ / ४५,९५१ / ९,२३३
चोविसावाडी / ५ / ३४,८१६ / ३५,३६२ / ५४६
रावेत किवळे / २४ / ३८,७७९ / ५१,९८९ / १३,२१०
वाकड / ३८ / ३४,८७३ / ४३,७४३ / ८,८७०
पिंपळे सौदागर / ४० / ३७,९२० / ४०,९५१ / ३,०३१
---
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d83047 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..