
शाळेसमोर विद्यार्थ्यांची सर्कस
लीड
‘सकाळ’मध्ये २३ व २४ जुलै रोजी ‘शाळांसमोर जीवघेणी कसरत’ आणि ‘शालेय बस खरंच सुरक्षित? असे दोन विशेष वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्याचबरोबर, वाकड परिसरातील शाळा भोवतालची वाहतूक कोंडी या समस्येबाबत ‘विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात’ हे फोटो फिचर २६ जुलैला प्रसिद्ध झाले होते. यावर वाचकांनी पाठविलेल्या प्रतिक्रिया.
................................
शाळांना जबाबदार धरावे
शाळांभोवती होणाऱ्या कोंडीला शाळा व्यवस्थापन जबाबदार आहे. शाळांना मोठ्या प्रमाणात शालेय शुल्क मिळते. त्यासाठी होणारी कोंडी टाळण्यासाठी त्यांनीच पर्यायी मार्ग वापरायला आहेत. भावी पिढीला सामाजिक जबाबदारीचे केवळ शिक्षण देणे ही जबाबदारी नसून पायाभूत उपाययोजना करुन त्यावर मात करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे चिंचवडमधील एल्प्रो स्कूल समोर देखील याचप्रकारे भयावह परिस्थिती आहे. या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या शेकडो लोकांना या कोंडीचा प्रचंड त्रास होतो. याची जबाबदारी शाळा व्यवस्थापनाने स्वीकारायला हवी. अन्यथा, शाळा बंद करून टाकाव्यात. शाळा व्यवस्थापनाकडे मी वारंवार इ मेलद्वारे तक्रारी केल्या आहेत. परंतु, प्रतिसाद मिळाला नाही.
- अजित गुजराती, चिंचवड
.........................
शाळांकडून दंड वसूल करा
शहरातील बहुतांश सर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळा सकाळी आणि संध्याकाळी दोन तास भरताना आणि सुटताना गर्दीची समस्या आहे. या शाळा शहरातील चौकांच्या प्रमुख ठिकाणी आहेत. एकावेळी मुलांना शाळेत सोडण्यास बस, मोटारी, दुचाकी मोठ्या प्रमाणात येतात. काही पालक पाळीव श्वानांनाही घेऊन येतात. याशिवाय इतर वाहनांची वर्दळ असल्याने रस्त्यांवर प्रचंड कोंडी होते. या शाळांचे प्ले ग्रुपचे शुल्क ७५ हजारांपर्यंत असते. तरीही, रस्ते मोकळे करण्याची प्राथमिक जबाबदारी या शाळा घेत नाहीत. त्यांनी गर्दीच्या काळात अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करावेत. प्रत्येकवेळी वाहतूक पोलिस जबाबदार नाहीत. त्यांचे कर्तव्य नागरिकांप्रती आहे. सरकारकडूनच इंग्रजी माध्यमाच्या शाळांना कोंडीबाबत कडक सूचना द्याव्यात. रस्ता सार्वजनिक मालमत्ता असल्याचा सल्ला द्यावा. यासाठी शाळांकडून दंड वसूल करण्यात यावा.
- गजानन राजाराम भोसले, पिंपळे सौदागर
..............................
वीस मिनिटांच्या फरकाने वर्ग सोडा
रस्ते प्रशस्त असूनही वाहतूक कोंडीची वेळ येत आहे. विविध वर्गाच्या मुलांसाठी शालेय बस अर्धा तास अगोदर सोडाव्यात. शाळा सोडताना १ ते ४ तसेच ५ ते ८ या वेळेत वर्ग २० मिनिटाच्या अंतराने सोडावेत. त्याप्रमाणे ज्यांना पालक घेण्यास येतात त्यांना दिलेली वेळ पाळण्यास बंधन घालावे. जेणेकरून वाहतूक कोंडी होणार नाही. सर्व बस जोपर्यंत जात नाहीत तोपर्यंत पालक प्रवेशव्दारा बाहेर ताटकळत उभे राहतात. लहान मुले पण ताटकळत असतात. तोपर्यंत वाहतूक कोंडी अधिक प्रमाणात वाढत जाते. त्यामुळे काही वेळेच्या फरकाने वर्ग सोडल्यास हा प्रयोग नक्कीच यशस्वी होइल.
- देवेंद्र लुंकड, आकुर्डी
............................
नागरिक जबाबदार झाला तरच प्रश्न सुटेल
वाहतूक कोंडी या समस्येला एक जबाबदार नागरिक म्हणून आपणही जबाबदार आहोत. सर्वाधिक कोंडी होणारा युरो स्कूल जवळचा साई चौक पाहा. येथील रस्ते प्रशस्त व उत्तम पादचारी मार्ग असलेले आहेत. त्यामुळे, महापालिकेला दोष कसा देणार? प्रत्येक शाळे सभोवती वाहतूक पोलिस हवा अशी अपेक्षा करणे कितपत योग्य आहे? तिसरे म्हणजे शाळा. पण स्वतःचे काम सोडून कोंडीचे नियोजन शाळेने करणे अवघड आहे. मी युरो स्कूल शेजारीच राहतो. त्यामुळे येथील वाहतूक कोंडी नेहमी अनुभवतो. बेजबाबदार वाहन धारकांना आवरताना शाळा कर्मचाऱ्यांच्या नाकी नऊ येतात. हॉर्नच्या आवाजाने सर्व परिसर दणाणून जातो. निश्चितच या वाहतूक कोंडीसाठी पालक व नागरिक जबाबदार आहेत.
पालक शाळेच्या आसपास राहत असूनही अट्टहासाने चारचाकी
वाहनाने मुलांना सोडवायला व घ्यायला येतात. प्रत्येक पालकाला पाल्याला शाळेच्या प्रवेशद्वारापर्यंत सोडायचे असते. थेट शाळेत आत जाईपर्यंत त्याला पाहायचे असते. तोपर्यंत पाठीमागील वाहन चालक हॉर्न वाजवत राहतो. फक्त माझाच पाल्य शाळेत व्यवस्थित पोहोचला पाहिजे, बाकी मला काही घेणे देणे नाही ही प्रवृत्ती बळावत चालली आहे. चौथी, पाचवी व नंतरच्या वर्गात शिकणारी व एक दोन किलो मीटरपर्यंत राहणारी मुले पायी शाळेत येऊ शकतील. आर्थिक प्रगती झाली असली तरी आरोग्य दुर्लक्षित होत चालले याचा पालकांनी विचार करावा. अपरिहार्य परिस्थितीत वाहन आणायचे असेल तर, शाळेपासून काही अंतरावर वाहने लावून पाल्याला शाळेत सोडवता येऊ शकते. कोणतीही शाळा चांगली वाईट नसते. फक्त ती आपल्या घरापासून जवळ असली पाहिजे. लांबच्या शाळेचा अट्टहास सोडून पाल्याचा वेळ वाचून तो अभ्यास चांगल्या कामासाठी करेल ही मानसिकता झाली आहे. माझ्या मुलाबरोबर इतरही मुले शाळेत येणार आहेत. या समाजाचा मी घटक असून इतरांची काळजी घेऊन माझी जबाबदारी पार पाडायला हवी. तरच, शाळेजवळ भेडसावणारी ही समस्या आटोक्यात येऊ शकेल.
- संजय भळगट, वाकड
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d83332 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..