
विविध विकास कामांसाठी २८ कोटी खर्चास मान्यता
पिंपरी, ता. ३ ः विविध विकास कामांसाठी येणाऱ्या सुमारे २८ कोटी ३४ लाख रुपये खर्चाच्या विषयांना महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी मंजुरी दिली.
महापालिका सभा, विधी समिती णि स्थायी समिती सभेची मान्यता आवश्यक असलेले विविध विषय मान्यतेसाठी होते. त्यासंबधी झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पाटील होते. दिघी येथील स्मशानभूमीला सीमाभिंत बांधणे, बोपखेल येथील महापालिका शाळेच्या वर्गखोल्या बांधणे, पिंपरी वाघेरे येथील पाच लाख लिटर क्षमतेची उंच टाकी पाडून नवीन उंच टाकी बांधणे, महापालिकेच्या मंजूर विकास योजनेतील पुनावळे आणि रावेत येथून जाणाऱ्या मुंबई-बंगळरू महामार्गाच्या दोन्ही बाजूस असलेल्या १२०० मीटर लांब व ६० मीटर रुंद सर्व्हिस रस्त्याने बाधित जमिनीचे भूसंपादन करणे आदी विषयांना मंजुरी दिली.
पिंपळे गुरव परिसरात जलनिःसारण नलिका टाकण्यासाठी २१ लाख; महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी गणवेश व स्वेटर खरेदी; पिंपरी येथील तपोवन रस्ता काँक्रिटीकरणासाठी एक कोटी ११ लाख; नाशिक फाटा ते वाकड रस्ता व पदपथ देखभाल दुरुस्तीसाठी ७८ लाख; काळेवाडी फाटा ते देहू-आळंदी रस्त्यावरील स्टॉर्म वॉटर चेंबर्स साफसफाईसाठी एक कोटी १७ लाख; प्रभाग नऊमधील गोदाम व इतर मिळकतींच्या दुरुस्तीसाठी ३४ लाख; प्रभाग ३१ नेताजीनगर जलनि:सारण कामांसाठी ३९ लाख; कासारवाडी शास्त्रीनगर, वंजारी चाळ, फुगेवाडीतील फुगे चाळ, वडार वस्ती परिसरातील जलनि:सारणासाठी ५२ लाख; महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय पदव्युत्तर संस्थेत अल्ट्रा हाय डेफिनेशन कॅमेरा सिस्टीम फॉर अॅडवान्स संच खरेदीसाठी पाच कोटी ५२ लाख; पीएमपीच्या संचलन तूट रक्कम १६ कोटी रुपये आदी खर्चासह तरतूद वर्गीकरणाच्या विषयांनाही मान्यता दिली.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d86418 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..