
नागरीकरणामुळे हरीतक्षेत्र घटतंय
पिंपरी, ता. ४ ः वाढत्या नागरीकरणामुळे हरीतक्षेत्रांची संख्या घटत असून बांधकामाचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. झाडांच्या जागेवर इमारती उभ्या राहत आहेत. अशा परिस्थितीत प्रत्येकाने झाडे लावून पर्यावरणाचे रक्षण करावे, असे आवाहन देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डचे अध्यक्ष तथा स्टेशन कमांडंट ब्रिगेडीयर अमन कटोच यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड, देहूरोड मिलिटरी स्टेशन आणि वनप्रकल्प विभाग पुणे यांच्यातर्फे निगडी येथील लष्करी जागेत वृक्ष लागवड मोहीम घेण्यात आली. त्यात कटोच बोलत होते. महापालिका आयुक्त राजेश पाटील, वनप्रकल्पाच्या विभागीय व्यवस्थापक सारिका जगताप, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमितकुमार माने, देहूरोड स्टेशन अॅडम कमांडंट कर्नल एन. चितिरन, वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव जाधव, महापालिका उपआयुक्त सुभाष इंगळे, उद्यान अधीक्षक जी. आर. गोसावी, सहायक उद्यान अधीक्षक मंजूषा हिंगे, राजेश वसावे, कॅन्टोन्मेंट बोर्ड शिक्षण विभागाच्या केंद्र प्रमुख एम. एफ. खान, महात्मा गांधी प्राथमिक शाळेचे शिक्षक रमेश कांदळकर, सुलभा शिंदे, आशा गाडे, वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत आरदवाड, रुपीनगर नागरी कृती समितीचे संदीप जाधव, देविदास बिरादार, जीवन बोऱ्हाडे, सागर तापकीर आदी उपस्थित होते.
ब्रिगेडीयर कटोच म्हणाले, ‘‘रेड झोनमुळे शहराच्या सीमेवरील काही जागा मोकळी आहे. तेथे बांधकाम होऊ शकत नाही. त्यामुळे याठिकाणी हरीत क्षेत्र तयार करणे शक्य होत आहे. झाडे लावणे सोपे असते. मात्र त्यांचे जतन आणि संवर्धन करणे तितकेच महत्त्वाचे आहे. या जागेच्या कडेने झाडे लावल्यास मधली जागा लष्कराच्या इतर कामासाठी भविष्य उपयोगात आणताना अडचण येणार नाही.’’
महापालिका यावर्षी तीन लाख झाडे लावणार आहे. विशेष मोहीम राबवून वृक्षारोपण सुरू आहे. निगडी रेड झोनमधील मोकळ्या जागेच्या कडेने ११ किलोमीटरच्या परिघात सुमारे एक लाख देशी वृक्षांचे रोपण करण्यास गुरुवारी प्रारंभ झाला. त्याअंतर्गत ३५० प्रजातींमधील देशी झाडांचे रोपण केले जाईल. शहर परिसरातही वृक्षारोपण सुरू आहे.
- राजेश पाटील, आयुक्त, महापालिका
--
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d86680 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..