
देशभरात ‘वन नेशन, वन रेडझोन हद्द’ करा
पिंपरी, ता. ५ : ‘वन नेशन, वन टॅक्स’ धोरणाप्रमाणेच देशभरात ‘वन नेशन, वन (सेफ्टी नॉर्मस) रेडझोन हद्द’ धोरण लागू करा, अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लोकसभेत शून्य प्रहरात बोलताना करून शिरूर व मावळ लोकसभा मतदारसंघातील रेडझोन बाधितांच्या व्यथांना वाचा फोडली.
गेल्या अनेक वर्षांपासून शिरूर लोकसभा मतदारसंघातील रुपीनगर, त्रिवेणी नगर, तळवडे, चिखली, भोसरी, वडमुखवाडी, दिघी आणि मावळ तालुक्यातील विविध भागातील पाच लाख नागरिक रेडझोन क्षेत्रात वास्तव्य करतात. बाधितांवर कारवाईची टांगती तलवार आहे. या रेडझोन बाधितांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर शुक्रवारी (ता. ५) खासदार डॉ. कोल्हे यांनी आवाज उठवला. यंदा देशाला स्वातंत्र्य मिळाल्याला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने केंद्र सरकारने ‘घर घर तिरंगा’ अभियान राबविले आहे, याबद्दल केंद्र सरकारचे अभिनंदन करून खासदार डॉ. कोल्हे म्हणाले, ‘‘आपण हे अभियान राबवीत असताना देशातील १३ राज्यांतील लाखो लोकांच्या मनात एक शंका निर्माण झाली आहे की, ते आपल्या ज्या घरावर तिरंगा फडकवू इच्छितात ते घर अधिकृतच नाही. कारण त्यांची घरे संरक्षण मंत्रालयाच्या रेडझोन हद्दीत आहेत. माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघात आणि शेजारच्या मावळमध्ये जवळपास पाच लाख नागरिक हे रेडझोन बाधित आहेत, ही बाब त्यांनी लोकसभा अध्यक्षांच्या लक्षात आणून दिली.
खासदार डॉ. कोल्हे म्हणाले, ‘‘१९७० मध्ये स्टोरेज टेक्निकल एक्स्पोलोजिव्ह कमिट रेग्युलेशनमध्ये २००५ मध्ये जी दुरुस्ती करण्यात आली, त्यानुसार रेडझोनची हद्द २७० ते ५०० मीटरपर्यंत निश्चित करण्यात आली होती. इंग्रजांच्या काळातील डिफेन्स ॲक्ट १९०३ नुसार ही रेडझोनची हद्द ५०० ते २००० यार्ड करण्यात आली आहे. यातील दुर्भाग्यपूर्ण बाब म्हणजे, स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाल्यानंतरही शिरूर व मावळ लोकसभा मतदारसंघासह देशातील रेडझोनची हद्द इंग्रजांच्या काळातील कायद्यानुसार निश्चित करण्यात आली असून ती २००० यार्ड इतकी आहे.’’
‘रेडझोनची हद्द ५०० मीटर करावी’
देशाच्या वेगवेगळ्या ठिकाणी रेडझोनची हद्द वेगवेगळी आहे. त्यामुळे त्यात एकसूत्रता असावी यासाठी ज्या प्रमाणे केंद्र सरकार ‘वन नेशन, वन टॅक्स’ धोरण देशात राबवित आहे. ‘वन नेशन, वन सेफ्टी नॉर्मस’ धोरण राबवावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना करीत स्टेक रेग्युलेशन कमिटी २००५ च्या दुरुस्तीनुसार रेडझोनची हद्द ५०० मीटर इतकी निश्चित करावी, अशी जोरदार मागणी खासदार डॉ. कोल्हे यांनी केली.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d87180 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..