
कोअर कमिटीमध्ये मुद्दा का मांडला नाही आमदार फुटण्यावरून अजित पवार यांचा सवाल
पिंपरी, ता. ६ : शिवसेनेचे आमदार फुटण्यास अजित पवार जबाबदार असतील तर; शिवसेना नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या तीन पक्षांच्या समन्वय समितीत (कोअर कमिटीत) हा मुद्दा त्याच वेळी का मांडला नाही, असा सवाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिवसेनेचे नेते, माजी मंत्री रामदास कदम यांच्या टीकेवर शनिवारी (ता. ६) चिंचवड येथे पत्रकार परिषदेत केला.
शिवसेनेचे आमदार फुटण्यास अजित पवार जबाबदार आहेत. त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शंभर आमदार करण्याचा चंग बांधला होता. त्यामुळे ते शिवसेनेच्या आमदारांना संपविण्याचे काम करत होते. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना वाचविण्यासाठी भाजपबरोबर गेले, अशी टीका रामदास कदम यांनी केली होती. याबाबत विचारले असता पवार बोलत होते.
अजित पवार म्हणाले की, शिवसेना, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची कोअर कमिटी होती. यामध्ये तीनही पक्षाचे प्रत्येकी दोन नेते होते. हे जर त्यांच्या लक्षात आले होते तर; त्यांनी त्याचवेळी शिवसेनेच्या नेत्यांनी कमिटीच्या बैठकीत हा मुद्दा का मांडला नाही.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे सचिवांना दिलेले अधिकार हे न्यायिक प्रश्नांबाबतच होते, असे म्हटले आहे, यावर विचारले असता अजित पवार यांनी त्याबाबतचे ४ ऑगस्टचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांचे पत्रच पत्रकार परिषदेत फडकाविले. ते म्हणाले की, या आदेशात पुढील आदेशापर्यंत म्हटले आहे. त्यामुळे ते आज असे म्हणू शकतात. अतिवृष्टीच्या भागात राज्य सरकारचे लक्ष नाही. पंचनामे करून मदत द्या, अशीच आमची मागणी आहे. पण; तसे होताना दिसत नाही. त्यासाठी खूप पाठपुरावा करावा लागतो, असेही त्यांनी सांगितले.
----------------------------
Web Title: Todays Latest Marathi News Pne22d87591 Txt Pc Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..