महात्मा गांधी चिंचवड रेल्वे स्थानकावर उतरण्याच्या घटनेला ८० वर्षे पूर्ण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महात्मा गांधी चिंचवड रेल्वे स्थानकावर उतरण्याच्या घटनेला ८० वर्षे पूर्ण
महात्मा गांधी चिंचवड रेल्वे स्थानकावर उतरण्याच्या घटनेला ८० वर्षे पूर्ण

महात्मा गांधी चिंचवड रेल्वे स्थानकावर उतरण्याच्या घटनेला ८० वर्षे पूर्ण

sakal_logo
By

पिंपरी, ता. ९ ः पिंपरी-चिंचवडचा स्वातंत्र्य लढ्याशी व स्वातंत्र्यपूर्व आंदोलनामध्ये सहभाग असल्याच्या अनेक घटना इतिहासात नोंदल्या गेल्या आहेत. यापैकी एक महत्त्वपूर्ण घटना म्हणजे आजपासून बरोबर ऐंशी वर्षांपूर्वी (९ ऑगस्ट १९४२) चिंचवड रेल्वे स्थानकावर महात्मा गांधीजी आले होते. चिंचवडला महात्मा गांधी यांचे पाय लागले होते.

या घटनेमागची पार्श्वभूमी अशी, ८ऑगस्ट १९४२ रोजी मुंबई येथे महात्मा गांधी यांनी ‘चले जाव’ हा चळवळीचा इशारा ब्रिटिशांना दिला. आणि स्वातंत्र्यप्राप्तीसाठी देशभरातून आंदोलनाला सुरुवात झाली. ब्रिटिश प्रशासन (इंग्रज) हादरले. संपूर्ण देशातील नागरिक पेटून उठल्याने इंग्रजांनी या आंदोलनाची व्याप्ती वाढू नये, म्हणून गांधीजींना मुंबईतच अटक केली. वातावरण स्थिर होईपर्यंत गांधीजींना पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये ठेवण्याचा निर्णय इंग्रज पोलिस अधिकाऱ्‍यांनी घेतला. ८ ऑगस्टला रात्री साडेआठ वाजता मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्‍या एका पॅसेंजर गाडीत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत गांधीजींना बसवण्यात आले. त्यांना अटक केली असून पुण्यात आणले जाणार...ही बातमी वाऱ्‍याच्या वेगाने सर्वत्र पसरली. मग स्वातंत्र्यप्राप्तीसाठी पेटून उठलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी पुणे स्थानकावर इंग्रजांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी व निषेध करण्याची तयारी सुरू केली.

पुण्यात गर्दी होऊन गडबड होऊ शकते, याची चाहूल इंग्रज पोलिस अधिकाऱ्‍यांना लागली. मग आपल्या नियोजनामध्ये बदल करत पहाटे ५ वाजून १३ मिनिटांनी पॅसेंजर गाडी चिंचवड रेल्वे स्थानकावर येताच गांधीजींना तिथे उतरवण्यात आले. अनपेक्षितपणे गांधीजी चिंचवडला उतरलेले पाहून मोजक्या कार्यकर्त्यांना त्यांचे दर्शन झाले. चिंचवड स्थानक ते पुणे-मुंबई महामार्ग या तीन मिनिटांच्या अंतरामध्ये खाण परिसर असल्याने मोठमोठे दगड होते. बैलगाडी जाईल इतकीच कच्ची वाट होती. चालत चालत गांधीजींना महामार्गावर आणल्यानंतर तिथून एका मोटारीत बसून पुण्याकडे नेण्यात आले.
--
स्थानकावर होता फलक
या प्रसंगाची आठवण म्हणून ‘या स्थानकावर महात्मा गांधीजींचे पाय लागले होते’ अशी आठवण असलेला फलक रेल्वे प्रशासनाने प्लॅटफॉर्मवर लावला होता. मागील काही वर्षापर्यंत हा फलक येथे होता. नंतर रेल्वे स्थानकाचे आधुनिकीकरण करताना हा फलक रेल्वे प्रशासनाने काढून टाकला.
--
स्वातंत्र्यदिनी पुन्हा लावावा फलक
दरम्यान स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना हा बोर्ड पुन्हा लावण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन आज चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार व पत्रकार विजय जगताप यांनी आज चिंचवडचे स्टेशन मास्तर एन. जी. नायर यांना आज दिले. तसेच, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, डीआरएम रेणू शर्मा यांना ईमेलद्वारे चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, संगीता जाधव, सूरज आसदकर, मनोहर जेठवाणी, मुकेश चुडासमा, निर्मला माने, हार्दिक जानी, नयन तन्ना, माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या वतीने मागणी करण्यात आली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d88410 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..