घरोघरी तिरंगा; मनोमनी तिरंगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घरोघरी तिरंगा; मनोमनी तिरंगा
घरोघरी तिरंगा; मनोमनी तिरंगा

घरोघरी तिरंगा; मनोमनी तिरंगा

sakal_logo
By

पिंपरी, ता. १४ ः उच्चभ्रू सोसायटीतील सदनिका असतील, मध्यवर्गियांची निवासस्थाने असतील, कामगारांच्या चाळी आणि गरिबांच्या वसाहती असतील, प्रत्येक ठिकाणी रविवारी (ता. १४) तिरंगामय वातावरण बघायला मिळाले. निमित्त होते, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांचे. त्यामुळे ‘घरोघरी तिरंगा; मनोमनी तिरंगा’ असेच देशभक्तिमय वातावरण होते.
देशाचा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन सोमवारी (ता. १५) देशभरात साजरा होत आहे. त्यानिमित्त केंद्र सरकारने शनिवारपासून (ता. १३) विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. घरोघरी तिरंगा लावण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी महापालिकेने चार लाख तिरंगा ध्वज मागवले होते. शिवाय, विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनीही आपापल्या भागात घरोघरी तिरंगा ध्वज वाटप केले आहेत. काही नागरिकांनी महापालिकेच्या विक्री केंद्रांवरून, तर काहींनी टपाल कार्यालयांतून ध्वज विकत घेतले आहेत. त्यामुळे रविवारी ‘घरोघरी तिरंगा’ लावलेला दिसून आला. काहींनी घरासमोर ध्वज उभारले, तर सोसायटीत राहणाऱ्या काहींनी गॅलरीत ध्वज लावले होते. लहान मुलांसह ज्येष्ठांचाही उत्साह मोठा होता. अनेकांनी वाहनांवरही ध्वज लावले आहेत. शहरातील महामार्गांवरील चौकांमध्ये विविध वस्तू विकून उदरनिर्वाह करणाऱ्या विक्रेत्यांकडेही राष्ट्रध्वज काठीसह विक्रीला होते. त्यांच्याकडूनही अनेकांनी ध्वज घेतले.

मुलांचा उत्साह
विशेष मुलांसह काही शाळांनी तिरंगा फेरीचे आयोजन केले होते. त्यात सहभागी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता. रविवारची सार्वजनिक सुटी असूनही बरेचशे विद्यार्थी फेरीमध्ये सहभागी झाले होते. चिंचवडगाव, प्राधिकरण, थेरगाव, भोसरी, सांगवीत असे वातावरण बघायला मिळाले. चिंचवड स्टेशन परिसरातील अण्णासाहेब मगर वसाहतीतील तीस-चाळीस मुले हाती तिरंगा घेऊन वसाहतीतून फिरत होते. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’ अशा घोषणा ते देत होते. चिंचवड येथील फेरीत विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य सेनानींची, क्रांतिविरांच्या वेशभूषा केल्या होत्या.

विविध कार्यक्रम
महापालिकेने चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मंगळवारी (ता. १६) सायंकाळी पाच वाजता प्रा. डॉ. सदानंद मोरे यांचे ‘स्वातंत्र्याच्या वाटचालीत मराठी साहित्याचे योगदान’ या विषयावर व्याख्यान होईल. माजी सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्यातर्फे १७ ऑगस्टपर्यंत चिंचवडेनगर येथील क्रांतिवीर चापेकरनगरमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. स्वातंत्र्य दिवस पाहिलेल्या नागरिकांचा सन्मान केला जाणार आहे. क्रांतिकारकांची वेशभूषा स्पर्धा होईल. तीन गटात निबंध स्पर्धा होईल. यात ‘१८५७ ते १९४७ या काळातील थोर क्रांतिकारक’ वयोगट पाचवी ते आठवी; ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षी बदलता भारत (वयोगट नववी ते बारावी) आणि ‘१९४७ ला स्वातंत्र्याचा शताब्दी वर्षात पदार्पण करतांना भारताची महासत्तेकडे वाटचाली विषयी संकल्पना’ (खुला वयोगट) असे विषय आहेत. क्रांतिकारकांचा सोनेरी इतिहासाविषयी चित्र प्रदर्शन सकाळी १० ते रात्री आठ या वेळेत खुले आहे.
---

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d90182 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..