स्वाईन फ्ल्युचे रूग्ण वाढताहेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वाईन फ्ल्युचे रूग्ण वाढताहेत
स्वाईन फ्ल्युचे रूग्ण वाढताहेत

स्वाईन फ्ल्युचे रूग्ण वाढताहेत

sakal_logo
By

पिंपरी, ता. २० ः शहरात कोरोनाचा कहर कमी झालेला आहे. परंतु कोणत्याही प्रकारची रोगराई वाढू नये, यासाठी महापालिका यंत्रणांनी नागरीकांना सजग केले असतानाच आता शहरात स्वाईन फ्ल्यूचे संकट ओढवले आहे. आत्तापर्यंत २१ रूग्ण आढळले असून ऑगस्टमध्ये दोन संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्‍वभूमीवर अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रतिबंधाच्या महत्त्वपूर्ण उपाययोजना व खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

गेल्या पाच वर्षात स्वाईन फ्ल्युचा एकही रूग्ण आढळला नव्हता. यंदा मात्र जुलै महिन्यापासूनच रूग्ण आढळण्यास सुरवात झाली आहे. अगोदरच लोकांमध्ये कोरोनामुळे भीतीचे वातावरण आहे. त्याचा संसर्ग होवू नये यासाठी महापालिका यंत्रणा निकराचे प्रयत्न करत आहेत. मात्र, याच दरम्यान स्वाईन फ्ल्यूचे रूग्ण मात्र वाढू लागले आहेत. आता पंधरा दिवसात २१ रूग्ण दाखल असून त्यामुळे नागरिकांमध्ये पुन्हा भीती पसरली आहे. आणि त्यातच दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर जून- जुलै महिन्यापासून डेंग्यूचे रूग्ण वाढण्यास सुरवात झाली. पावसाळा लांबल्याने डेंग्यू रुग्णांची संख्याही वाढत आहे. परिणामी, महापालिकेने कोरोनोबरोबरच स्वाईन फ्लू प्रतिबंधासाठी देखील उपाययोजना सुरू केल्या आहेत अशी माहिती वैद्यकीय विभागाकडून देण्यात येत आहे.

बालकांना जपा
बाल रुग्णांमध्ये सौम्य ते मध्यम स्वरूपाचा ताप आढळतो. घसादुखी असणाऱ्या बाळांमध्ये तोंडातून अतिप्रमाणात लाळ गळते. त्या अनुषंगाने सध्या आढळून येत असलेल्या इन्फ्ल्युएंझा (H1N1) केसेस पाहता नागरीकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय विभागाने केले आहे.

हे उपाय करा
-वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवा
-पौष्टिक आहार घ्या
-लिंबू, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्यांचा आहारात
वापर करा
-धूम्रपान टाळा
-पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या
-भरपूर पाणी प्या
-हस्तांदोलन टाळा
- सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका
-डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नका
-फ्ल्यू सदृश लक्षणे असतील तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका

आजाराची लक्षणे
-ताप
- घसादुखी, घशाला खवखव
- खोकला, नाक गळणे
- अंगदुखी
- डोकेदुखी


कोट
‘‘गंभीर रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिका रुग्णालयामध्ये स्वाईन फ्ल्यू (H1N1) प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येत आहे. डॉक्टर्स आणि अवैद्यकीय कर्मचारी, गरोदर महिला, उच्च रक्तदाब व मधुमेह असलेले रुग्ण (अति जोखिमेचे रुग्ण) यांनी त्याचा लाभ घ्यावा.’’
-डॉ. पवन साळवे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी महापालिका