व्यायामाचे फायदे असे आणि तसेही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्यायामाचे फायदे
असे आणि तसेही
व्यायामाचे फायदे असे आणि तसेही

व्यायामाचे फायदे असे आणि तसेही

sakal_logo
By

आज बरोबर दोन महिने झाले. सकाळी साडेपाचला तळजाई टेकडीवर व्यायामासाठी जात आहे. तिकडून आल्यानंतर तासभर स्वीमिंग करतो. एकदम फ्रेश वाटते. साखरेच्या पदार्थांकडे तर ढुंकूनही पाहत नाही. चहा- कॉफी एकदम बंद म्हणजे बंद! चमचमीत जेवणावरही काट मारली आहे. फक्त फळं, हिरव्या भाज्या आणि सॅलडवर भर दिला आहे. संध्याकाळी तासभर तरी सायकलवर रपेट मारतो. या सगळ्यामुळे माझं वजन दहा किलो कमी झाले आहे. चेहरा सतत फ्रेश दिसतो. ब्लडप्रेशर, शुगर एकदम आटोक्यात आलंय. निरोगी आयुष्य जगण्यासाठी आयुष्यभर असंच वागायचं.......
फेसबुकवर कोणाची तरी ही पोस्ट वाचून मनोहरचा उत्साह एकदम वाढला. आता आपणही असंच वागायचं, असं त्यानं ठरवलं. पहाटे पाचलाच मला झोपेतून उठव, असं त्याने स्मिताला सांगितले.
‘‘अहो, असा संकल्प गेली दहा वर्षे तुम्ही करत आहात. याबाबत तुमच्या संकल्पाच्या सातत्याला दाद दिली पाहिजे.’’ स्मिताने कुत्सितपणे म्हटले. बायको आपल्याला पहाटे उठवेल, याची त्याला खात्री नसल्याने त्याने गजर लावला व तो झोपी गेला. पहाटे पाचला तो साखरझोपेत असताना गजर वाजू लागला. त्यावेळी त्याने चिडून गजरच फेकून दिला व पांघरूण घेऊन परत झोपला. मात्र, आपणच गजर लावल्याचे लक्षात आल्यावर पुन्हा तो उठला व घराबाहेर पडला. बागेत आल्यानंतर त्याचे डोकेच फिरले. मॉर्निंग वॉकला यायचं आणि बाकड्यावर बसून मोबाईल बघत बसायचं, असं करणाऱ्या लोकांचा त्याला भयंकर राग आला. ‘अरे जनाची नाही..मनाची तरी लाज बाळगा. तुमच्यामुळं मला बसून मोबाईल बघता येत नाही,’ असं तुच्छतेने म्हणत तो एखादं बाकडं रिकामं व्हायची वाट पाहू लागला. सुदैवाने दहा मिनिटानंतर त्याला जागा मिळाली. मग तो मोबाईलवर ‘व्यायामाचे फायदे’ वाचू लागला. ते वाचल्यानंतरही त्याला एकदम फ्रेश वाटू लागले. घरी आल्यानंतर खूप भूक लागली आहे, असे म्हणून कढईभर पोहे त्याने फस्त केले. यावर स्मिताने त्याला चांगलेच झापले. मग दुसऱ्या दिवसांपासून तो बाहेरच तीन- चार वडापाववर ताव मारू लागला. आपण फक्त चालण्यापेक्षा धावलं पाहिजे, असं मनोहरला वाटू लागलं आणि दोन दिवस तो शंभर मीटर धावला. मात्र, ‘कितने भागोगे, क्या मिलेगा’ हे प्रसिद्ध वचन त्याला आठवू लागल्याने त्याने तो नादही सोडून दिला. बागेत बसलेला असताना मोबाईलवर नेहमीप्रमाणे ‘व्यायामाचे फायदे’ तो वाचू लागला. त्यावेळी सायकल चालवण्यासारखा व्यायाम नाही, असं वाचल्यानंतर त्याने लगेचच सायकलही विकत घेतली. तळजाई टेकडीवर दोन तास सायकलवरून रपेट तो मारू लागला. हा नित्यक्रम तीन महिने करूनही त्याचे वजन पावशेरही कमी झाले नाही, हे पाहून स्मितासह तो काळजीत पडला. आपला नवरा एवढा व्यायाम करूनही त्याची वजनासह ढेर का कमी होत नाही, हे पाहण्यासाठी ती एकदा तळजाईवर आली. त्यावेळी मनोहरचा मित्र सायकल चालवत होता व तो त्याच्या मागे आरामात बसला होता. हे दृश्‍य पाहून तिने कपाळावर हात मारला. त्यानंतर त्याचं तळजाईवर येणंही बंद झालं. गेल्या महिन्याभरात आपलं वजन दहा किलोनं वाढल्याचं पाहून, त्याच्या पायाखालची वाळू सरकली. मग त्याने
डॉक्टरांची भेट घेतली.
‘‘वजन कमी करण्यासाठी तुम्ही तातडीने जिम जॉईन करा.’’ डॉक्टरांनी त्याला सल्ला दिला. त्याने तो तातडीने अमलात आणला. सहा महिन्यांचे बारा हजार रुपये फी भरून त्याने ‘जिम जॉईन’ केली. आता तो रोज वजन कमी झालं की नाही, हे घरच्या वजनकाट्यावर बघतो. मात्र, जिममध्ये प्रत्यक्ष कधी जायचं, याबाबत त्याने अद्याप विचार केला नाही.