पाठीवर हात ठेवून, नुसतं लढ म्हणा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाठीवर हात ठेवून, नुसतं लढ म्हणा
पाठीवर हात ठेवून, नुसतं लढ म्हणा

पाठीवर हात ठेवून, नुसतं लढ म्हणा

sakal_logo
By

‘‘साहेब, हार- फुले घ्या. तुमच्या मनातील इच्छा गणपतीबाप्पा पूर्ण करील.’’ सारसबागेसमोरील मुख्य प्रवेशद्वारासमोरील दहा- बारा वर्षांच्या चिमुरडीचे बोलणे ऐकून प्रवीण थांबला.
‘‘वीस रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंत हार आहेत. शंभर रुपयांचा हार घेतल्यास गुलाबाचे टपोरे फूल एकदम फ्री देणार.’’ तिच्या संभाषणचातुर्यावर प्रवीण एकदम खूष झालो. शंभर रुपयांचा हार तिच्याकडून घेतला.
‘‘शाळेत जातेस की दिवसभर हेच काम करतेस?’’ त्याने सहज प्रश्‍न विचारला.
‘‘मी पाचवीत शिकते. शाळा सुटल्यानंतर थेट इकडेच येते. मोठा भाऊ नववीत शिकत आहे. तो सकाळी पेपर आणि दुधाची लाईन टाकतो. त्यानंतर शाळेत जातो.’’ तिने माहिती पुरवली.
‘‘आणि आई- वडील काय करतात?’’ प्रविणच्या या प्रश्‍नावर पोपटासारखी बोलणाऱ्या चिमुरडीच्या डोळ्यांत पाणी आले. डोळ्यांत कचरा गेला आहे, असे म्हणून तिने अश्रू टिपले.
‘‘मी एक वर्षांची असताना वडील गेले आणि गेल्या वर्षी आईपण देवाघरी गेली. आता आम्ही दोघेच असतो.’’ त्या मुलीचे ऐकून प्रविणच्या हृदयातही कालवाकालव झाली.
‘‘राहायला कोठे आहात?’’ प्रविणने विचारल्यावर पर्वतीच्या दिशेने बोट दाखवत ती म्हणाली,‘‘जनता वसाहतीतील एका झोपडीत आम्ही राहतो.’’ त्यानंतर प्रविणने पैसे देऊन हार व फुले घेतले. देवदर्शन करून आल्यानंतर मघाच्या मुलीने प्रविणला आवाज दिला.
‘‘साहेब, तुम्ही हार घेऊन गेल्यानंतर मी तुम्हाला दोन-तीन वेळा आवाज दिला. मात्र, तुम्ही ऐकलेच नाही. त्यानंतर गर्दीत दिसेनासे झालात. मी घरी चालले होते पण तुमची वाट पाहत थांबले.’’ तिने म्हटले.
‘‘माझ्याकडे काही काम आहे का?’’ प्रविणने विचारले.
‘‘अहो, तुम्ही मला पाचशेची नोट दिली आणि उरलेले पैसे न घेताच निघून गेलात.’’ त्या मुलीने म्हटले. यावर प्रविणला आश्‍चर्य वाटले. आपण शंभर रुपये दिले की पाचशे हा त्याला संभ्रम पडला. मात्र, तोपर्यंत मुलीने चारशेच्या नोटा त्याच्या हातावर ठेवून ती जनता वसाहतीच्या दिशेने निघाली.
‘‘ए मुली, अगं थांब....’’ तिच्या प्रामाणिकपणावर खूष होत प्रविणने तिला थांबवले.
‘‘अहो काका, माझं नाव नीलिमा आहे.’’ तिने धिटाईने उत्तर दिले. त्यानंतर प्रविणने तिचे आभार मानले व जनता वसाहतीतील तिच्या घरचा पत्ता घेतला.
दुसऱ्या दिवशी सायंकाळी प्रवीण त्यांच्या घरी पोचला. त्यावेळी निलिमाचा भाऊ राहुल स्वयंपाक करत होता. प्रविणने ओळख करू दिली.
‘‘तायडी, सारसबागेतून अजून आली नाही.’’ राहुलने म्हटले. त्यानंतर त्याने चहा करून प्रविणला दिला. थोड्याच वेळात नीलिमा आली. फ्रेश होऊन ती कॉटवर बसली.
‘‘दोन वर्षांपूर्वी आमची आई गेली. त्यावेळी आमच्यावर आभाळ कोसळलं होतं. सगळंच संपल्यासारखं झालं. पण आम्ही एकमेकांकडे बघत स्वतःला सावरलं....’’ राहुलने अश्रूंना मोकळी वाट करून देत म्हटले.
‘‘आई आजारी होती. त्यावेळी तिच्यावर उपचार करायला आमच्याकडे पैसे नव्हते. पैशांअभावी आम्ही आमच्या आईला मुकलो. पोरकेपणाचे दुःख काय असतं, हे आम्ही आता अनुभवत आहोत. मात्र, जी वेळ आमच्यावर आली, तशी कोणावर येऊ नये, यासाठी मी डॉक्टर होऊन, गोर-गरिबांवर मोफत उपचार करण्याचं ठरवलंय. माझी आई अनेकदा स्वप्नात येते. त्यावेळी मी तिला डॉक्टर होण्याचं वचन देतो. त्यावेळी तिचा हसरा चेहरा माझ्या नजरेसमोरून दिवसभर हलत नाही.’’ राहुलने म्हटले.
‘‘तायडीलाही खूप शिकवून स्वतःच्या पायावर उभी करणार आहे.’’ राहुलने ठामपणे म्हटल्यावर प्रविणच्या डोळ्यांतही पाणी दाटले. त्याने खिशात हात घालून दहा हजार रुपये काढले.
‘‘तुमच्या शिक्षणासाठी माझ्याकडून छोटीसी भेट...’’ प्रविणने म्हटले. त्यावेळी त्याला थांबवत राहुल म्हणाला, ‘‘साहेब, पैसे नकोत आणि सहानुभूतीही नको.
पाठीवर हात ठेवून, नुसतं लढ म्हणा...’’ राहूलचं शब्द ऐकताच प्रविणनं साश्रूनयनांनी दोघांनाही शुभेच्छा दिल्या.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d92283 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..