गुन्हे वृत्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हे वृत्त
गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

sakal_logo
By

कुत्रा भुंकत असल्याने
चुलत्याने केले पुतण्यावर कोयत्याने वार

पिंपरी, ता. २२ : ‘तुझा कुत्रा माझ्यावर का सारखा भुंकतो’ असे म्हणत चुलत्याने पुतण्यावर कोयत्याने वार केले. तसेच परिवाराला खूण करण्याची धमकी दिली. हा प्रकार मामुर्डी येथे घडला.

याप्रकरणी शरद माणिक जाधव (रा. तिरंगा कॉलनी, आझादनगर, मामुर्डी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार नागनाथ धोंडिराम जाधव (वय ३५, रा. तिरंगा कॉलनी, आझादनगर, मामुर्डी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी व आरोपी हे चुलते-पुतणे आहेत. आरोपी चुलत्याने फिर्यादीस ‘तुझा कुत्रा माझ्यावर का सारखा भुंकतो’ या कारणावरून शिवीगाळ करीत परिवाराला खल्लास करण्याची धमकी दिली. त्यानंतर कोयत्याने फिर्यादीवर वार केले. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. तसेच फिर्यादी यांच्या बहिणीला कोयत्याच्या उलट्या बाजूने मारून जखमी केले. याप्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
--------------------
रहाटणीत दहीहंडीच्या कार्यक्रमात
टोळक्याकडून तरुणाला बेदम मारहाण

पिंपरी, ता. २२ : दहीहंडी पाहत असताना तरुणाला सहा जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केली. ही घटना रहाटणी येथे घडली.

याप्रकरणी दीपक दशरथ बनसोडे (रा. रहाटणी ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार बंटी कांबळे, दीपक दाखले, रोहित नायगम, ऋषिकेश माने, निखिल येवले व एक महिला (सर्व रा. नखातेनगर, रहाटणी ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे गोडांबे कॉर्नर येथे दहीहंडी पाहत असताना आरोपी तेथे आले. फिर्यादीला शिवीगाळ, धक्काबुक्की करीत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. दरम्यान, फिर्यादी यांचे मित्र आतिष कांबळे व आशिष शेटे भांडणे सोडविण्यास आले असता त्यांना आरोपींनी धरून ठेवले. तर आरोपी दीपक याने फिर्यादीच्या डोक्यात दगड मारला. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
----------------------------

सोने देण्याचे आमिष दाखवून
हिंजवडीत महिलेची फसवणूक

पिंपरी, ता. २२ : एक तोळ्याच्या बदल्यात दोन तोळे सोने देण्याचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक केली. हा प्रकार हिंजवडी येथे घडला.

याप्रकरणी एका महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञात महिलांवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी या रविवारी सकाळी अकराच्या सुमारास हिंजवडीतील लक्ष्मी चौक येथे भाजीपाला आणण्यासाठी गेल्या होत्या. तेथे त्यांना आरोपी महिला भेटल्या. एका महिलेने तिच्या पिशवीतील मूठभर सोन्यासारखे असलेले मनी फिर्यादीला दाखवले. तुमच्याकडे एक तोळा असून मी तुम्हाला दोन तोळे देते असे आमिष त्यांना दाखवले. त्यानंतर फिर्यादी यांना रिक्षाने डांगे चौक येथे घेऊन गेले. फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व कानातील कर्णफुले काढून घेतली. त्यानंतर फिर्यादी यांना कागदी कपात वाळू असलेली पिशवी देऊन फिर्यादीची फसवणूक केली. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
-------------------

दिघीत विनयभंग प्रकरणी एकाला अटक

पिंपरी, ता. २२ : महिलेशी अश्लील वर्तन करीत जिवे मारण्याची धमकी दिली. महिलेच्या पतीलाही मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. हा प्रकार दिघी येथे घडला.
याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिवाजी शेषराव गावंडे (वय ४१, रा. माऊलीनगर, डुडुळगाव) या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादी व त्यांचे पती घराच्या पार्किंगमध्ये उभे असताना आरोपी तेथे आला. फिर्यादीचे पती यांना तुम्ही भाडेकरू कोणाला विचारून ठेवलेत, भाडेकरूचे आधारकार्ड
मला द्या, त्यांचा पत्ता, नाव मोबाईल क्रमांक मागितला. त्यावर फिर्यादीचे पती म्हणाले आम्ही पोलिसांना देऊ, तुला कशाला पाहिजे. त्यावर आरोपीने फिर्यादीच्या पतीला मारहाण केली. फिर्यादी मध्ये गेल्या असता आरोपीने त्यांच्याशी अश्लील वर्तन केले. फिर्यादी हे घरात पळून गेल्या व दरवाजा लावून घेतला असता आरोपी दरवाजावर लाथा मारू लागला. बाहेर नीघ मारूनच टाकतो, असे म्हणत शिव्या देत गल्लीत फिरू लागला. याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
------------------

मोशीत सोसायटीच्या
महिला पदाधिकाऱ्याचा विनयभंग

पिंपरी, ता. २२ : नळ चालूच ठेवून पाणी वाया घालवत असल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून सोसायटीतील रहिवाशांना शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच सोसायटीच्या महिला पदाधिकाऱ्याशी अश्लील वर्तन करीत विनयभंग केला. हा प्रकार मोशी येथे घडला.

याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजकुमार सस्ते (वय ६०), मयूर सस्ते (वय ३०) व एक महिला (सर्व रा. निवृत्ती हाईट्स, शिवाजीवाडी, मोशी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी या निवृत्ती हाईट्स शिवाजीवाडी, मोशी या सोसायटीच्या सहखजिनदार आहेत. आरोपींनी त्यांच्या मालकीचा फ्लॅट भाड्याने दिलेला आहे. दरम्यान, या फ्लॅटमधील व्यक्ती नळ चालूच ठेवून पाणी वाया घालवत असल्याने फिर्यादी व इतर लोकांनी त्याला जाब विचारला. यावरून आरोपी मयूर सस्ते याने आमच्या भाडेकरूकडे कशाला आला आहे, असे म्हणत फिर्यादी तसेच सोसायटीतील इतर रहिवाशांना शिवीगाळ केली. तर राजकुमार सस्ते याने फिर्यादीच्या पतीसह इतर लोकांना शिवीगाळ करीत त्यांच्या अंगावर धावून जात जिवे मारण्याची धमकी दिली. दरम्यान, फिर्यादी या त्यांना अडविण्यासाठी मध्ये गेल्या असता त्यांच्याशी अश्लील वर्तन करीत विनयभंग केला. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.
------------------

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d92587 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..