महिला सबलीकरणासाठी महापालिकेची ‘नवी दिशा’ रोजगारांची संधी उपलब्ध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Women Employment
महिला सबलीकरणासाठी महापालिकेची ‘नवी दिशा’ रोजगारांची संधी ः विविध उपक्रमांच्या माध्यमातून आर्थिक सक्षमतेचा प्रयत्न

महिला सबलीकरणासाठी महापालिकेची ‘नवी दिशा’ रोजगारांची संधी उपलब्ध

पिंपरी - महिला सक्षमीकरणासाठी महापालिका विविध उपक्रम राबवीत आहे. त्यात ‘नवी दिशा’ संकल्पनेच्या माध्यमातून सार्वजनिक स्वच्छतागृहांची दैनंदिन साफसफाई, शून्य कचरा निर्मिती व कचऱ्यापासून खत निर्मिती, कापडी पिशव्यांची निर्मिती अशा उपक्रमांचा समावेश आहे. सद्यःस्थिती हे उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबविले जात असून, सर्व शहरात त्याची व्याप्ती वाढवून महिला राहात असलेल्या भागातच त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.

स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत महापालिका स्वच्छ सर्व्हेक्षण राबवत आहे. कचरामुक्त शहर करण्यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केले आहे. आता झोपडपट्ट्यांमधील कचऱ्याबाबत जनजागृती व्हावी, या दृष्टीने प्रयत्न केले जात आहे. त्याला महिलांच्या बचतगटांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यांच्या माध्यमातून वस्तीतील सार्वजनिक स्वच्छतागृह साफसफाई प्रकल्प सर्वप्रथम पिंपरीतील शास्रीनगरमध्ये राबविण्यात आला. त्याची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. सद्यःस्थितीत गवळी माथा व थेरगाव येथील बचतगटांमार्फत काम सुरू आहे.

कापडी पिशव्या

गरजू महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कापडी पिशव्या तयार करण्याचे काम थेरगाव येथील ग क्षेत्रिय कार्यालयाच्या जुन्या इमारतीतीत सुरू आहे. त्यासाठी ‘नवी दिशा शिलाई युनिट’ स्थापन केले आहे. ‘ग’ कार्यालय क्षेत्रातील झाशीची राणी लक्ष्मीबाई, सिद्धी व भरारी या महिला बचतगटांमार्फत हे काम सुरू आहे. तसेच, प्लास्टिकमुक्त शहरासाठी व बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांना (कॅरिबॅग) पर्याय देण्यासाठी कापडी पिशव्यांचा अधिकाधिक वापर करण्यासाठी जनजागृती केली जात आहे.

कचऱ्यापासून खत

एमआयडीसीतील गवळी माथा वसाहतीतील महिलांनी शून्य कचरा संकल्पना राबविण्याचा निर्धार केला आहे. त्यांनी ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती सुरू केली आहे. त्यासाठीचा प्रकल्प नेहरूनगर येथील गुलाबपुष्प उद्यानात सुरू केला आहे. त्यात गवळी माथा वसाहतीतील रोजचा कचराच आणला जात आहे. जिजाऊ, संस्कृती, महालक्ष्मी व श्रीकृष्ण या महिला बचतगटांच्या माध्यमातून काम सुरू आहे. ‘मिशन झिरो वेस्टेज’साठी कचरा अलगीकरणाबाबत जनजागृती व प्रबोधनही केले जात आहे.

स्वच्छतागृह सफाई

महापालिकेच्या माध्यमातून शहरातील वसाहतींमध्ये व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतागृह आहेत. त्यांची दैनंदिन साफसफाई ठेकेदारांकडून केली जाते. मात्र, बहुतांश स्वच्छतागृहांबाबत तक्रारी होत्या. त्यामुळे स्थानिक महिला बचतगटांनाच स्वच्छतागृह साफसफाईचे काम देण्याची निर्णय प्रशासनाने घेतला. त्याचा प्रारंभ शास्रीनगरमधून झाला. आता गवळी माथा वसाहतीतील कामही स्थानिक महिला गटच पाहात आहे. त्यामुळे महिलांना घराजवळच काम मिळून त्या आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील, अशी अपेक्षा आहे.

आमचे दहा बचत गट आहेत. एका गटात दहा महिला अशा सत्तर जणींचा समावेश आहे. स्वच्छतागृह साफसफाईच्या माध्यमातून महिला काम करीत आहेत. आता कचऱ्यापासून खत निर्मिती करण्याचे कामही त्या करणार आहेत. त्यांना रोजगार मिळणार आहे. कचऱ्यापासून तयार झालेले खत महापालिकेच्या उद्यानांतील झाडांना टाकले जाणार आहे. खत निर्मिती प्रकल्पापासून संबंधित उद्यानांपर्यंत खत पोहोचवायचे कामही बचत गटांच्या माध्यमातूनच महिलाच करणार आहेत.

- मंगल वाडकर, जिजाऊ बचतगट, गवळी माथा

पिंपरीतील शास्रीनगरमध्ये आम्ही सुरवातीस सार्वजनिक स्वच्छतागृह साफसफाईचे काम महिला बचत गटाला दिले. नवी दिशा उपक्रमांतर्गत सध्या १६ स्वच्छतागृहांचे काम सुरू आहे. शून्य कचरा व जुन्या कापडांपासून कापडी पिशव्यांची निर्मिती उपक्रम सुरू केला आहे. यामुळे स्थानिक महिलांना त्या राहात असलेल्या भागातच रोजगार मिळाला आहे. हळूहळू सर्वच भागात हा उपक्रम राबविण्याचा विचार आहे. यामुळे स्थानिक समस्या सुटणार असून महिलांसाठी घराजवळच रोजगार निर्मिती होणार आहे.

- अजय चारठाणकर, उपायुक्त, महापालिका

दृष्टिक्षेपात महिलांसाठी रोजगार

- स्वच्छतागृह साफसफाईची कामे - १६

- शून्य कचरा निर्मिती वसाहत उपक्रम - १

- कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्प - १

- कापडी पिशव्या निर्मिती केंद्र संख्या - १

महापालिकेचे भविष्यातील नियोजन

- शून्य कचरा व खतनिर्मिती प्रकल्प वाढवणे

- कापडी पिशव्या निर्मिती केंद्रांची संख्या वाढवणे

- ॲनिमिया मुक्तीसाठी महिलांची नियुक्ती करणे

- सर्व स्वच्छतागृहांची कामे महिला बचतगटांना देणे

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d92784 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..