मुळा-पवना नद्यांच्या पातळीत वाढ मुळशी व पवना धरणातून विसर्ग; सांगवी, दापोडीसह नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुळा-पवना नद्यांच्या पातळीत वाढ

मुळशी व पवना धरणातून विसर्ग; सांगवी, दापोडीसह नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
मुळा-पवना नद्यांच्या पातळीत वाढ मुळशी व पवना धरणातून विसर्ग; सांगवी, दापोडीसह नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

मुळा-पवना नद्यांच्या पातळीत वाढ मुळशी व पवना धरणातून विसर्ग; सांगवी, दापोडीसह नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा

sakal_logo
By

पिंपरी, ता. २४ ः गेल्या तीन-चार दिवसांत थंडावलेल्या पावसाने बुधवारी (ता. २४) पहाटेपासूनच शहर परिसरात जोरदार हजेरी लावली. दिवसभर ऊन-सावलीचा खेळही रंगला. दरम्यान, मावळ व मुळशी तालुक्यातही पावसाचा जोर कायम असून, सर्वच धरणे शंभर टक्के भरले आहेत. त्यामुळे धरणांमधून विसर्ग वाढविण्यात आला आहे. विशेषतः मुळशी धरणातून सकाळी नऊपासून दुपारी दोनपर्यंत अवघ्या पाच तासांत चार वेळा विसर्ग वाढवण्यात आला. त्यामुळे मुळा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
शहर परिसरात गेले तीन-चार दिवस पावसाने विश्रांती घेतली होती. तुरळक सरी कोसळत होत्या. मात्र, बुधवारी पहाटेपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभर अशीच स्थिती होती. मात्र, अधूनमधून सूर्यदर्शनही झाले. त्यामुळे ऊन-पावसाचा खेळ अनुभवायला मिळाला. पावसामुळे काही ठिकाणी रस्ते चिखलमय झाले आहेत. सखल भागांमध्ये पाणी साचले आहे. दरम्यान, मुळशी तालुक्यातील मुळशी धरणातून मुळा नदीत, मावळातील कासारसाई व पवना धरणातून पवना नदीत आणि आंद्रा व वडिवळे धरणातून सोडलेले पाणी इंद्रायणी नदीत येत असल्याने शहरातून वाहणाऱ्या या तीनही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

सांगवी-दापोडीत सतर्कता हवी
मुळा व पवना नदीचा संगम जुनी सांगवी व दापोडी येथे होतो. एका बाजूला पुण्यातील बोपोडी आहे. मुळशी धरणातून सातत्याने विसर्ग वाढविण्यात आला आहे. तर, पवना धरणातूनही विसर्ग सुरू आहे. त्यामुळे दोन्ही नद्यांच्या संगमावर पाण्याचा फुगवटा होऊन पाणी पातळी वाढते. मुळा नदीचे पाणी सांगवीतील मधुबन सोसायटी, शिक्षक कॉलनी, मुळा नगर, पवनानगर, संगमनगर, ममतानगर भागात शिरते. संगमाजवळील दापोडीतील सिद्धार्थनगर, पवारनगर भागातही पाणी शिरते. पुणे-मुंबई महामार्गावरील हॅरिश पुलाखालील बोपोडीतील भुयारी मार्ग पाण्याखाली जातो. त्यामुळे या भागातील नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे.

पवना धरण स्थिती (बुधवारी दुपारी २.२५ वाजता)
दैनंदिन पाऊस ः ३२ मिलिमीटर
१ जूनपासून पाऊस ः २२४७ मिलिमीटर
पाणीपातळी ः ६१३.२६ मीटर
पाणीसाठा ः १०० टक्के

मुळशी धरणातून बुधवारचा विसर्ग (क्युसेकमध्ये)
सकाळी ७ ः ७,९२०
सकाळी ९ ः १०,५६०
सकाळी १० ः १३,२००
दुपारी १ ः १८,४८०
दुपारी २ ः २१,२८०

मावळ व मुळशीतील धरणांतून विसर्ग
पवना धरण ः ३,५००
मुळशी धरण ः २१,२८०
वडिवले ः १,३७६
आंद्रा ः ३७६

पवना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडणाऱ्या पावसाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे पवना धरणातून चालू असलेला विसर्ग वाढविण्यात आला आहे. बुधवारी सकाळी साडेअकराला तीन हजार पाचशे क्युसेकप्रमाणे नदी पात्रात विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पवना नदी काठच्या गावांतील रहिवाशांनी सतर्क राहावे.
- समीर मोरे, प्रमुख, पवना धरण
---------------------
मुळशी धरणातून सकाळी नऊ वाजता १० हजार ५६० क्युसेक प्रमाणे विसर्ग सुरू होता. तो दुपारी दोनपर्यंत २१ हजार २८० क्युसेक प्रमाणे वाढविण्यात आला आहे. त्यामुळे मुळा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व आवश्यकतेनुसार त्यात बदल होऊ शकतो.
- बसवराज मुन्नोळी, प्रमुख, टाटा पॉवर, मुळशी

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d93095 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..