फिरत्या रथांसह घाटांवर मूर्ती संकलन व्यवस्था महापालिका आयुक्त सिंह यांची माहिती; पर्यावरणपूरक उत्सवाचे आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फिरत्या रथांसह घाटांवर 
मूर्ती संकलन व्यवस्था
महापालिका आयुक्त सिंह यांची माहिती; पर्यावरणपूरक उत्सवाचे आवाहन
फिरत्या रथांसह घाटांवर मूर्ती संकलन व्यवस्था महापालिका आयुक्त सिंह यांची माहिती; पर्यावरणपूरक उत्सवाचे आवाहन

फिरत्या रथांसह घाटांवर मूर्ती संकलन व्यवस्था महापालिका आयुक्त सिंह यांची माहिती; पर्यावरणपूरक उत्सवाचे आवाहन

sakal_logo
By

पिंपरी, ता. २५ ः नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करावा. महापालिकेतर्फे घाटांवर गणेश मूर्ती संकलनाची आणि फिरते मूर्ती संकलन रथांचीही व्यवस्था केली आहे, अशी माहिती महापालिका प्रशासक शेखर सिंह यांनी दिली.
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासासाठी स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, महापालिका व पोलिस अधिकाऱ्यांची बैठक गुरुवारी (ता. २४) महापालिकेत झाली. त्या वेळी सिंह बोलत होते. अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, पोलिस उपायुक्त मंचक इप्पर, आनंद भोईटे, सहायक पोलिस आयुक्त डॉ. सागर कवडे, शहर अभियंता मकरंद निकम, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, आरोग्य कार्यकारी अधिकारी गणेश देशपांडे यांच्यासह संस्कार प्रतिष्ठान, तनपुरे फाउंडेशन, पुनरावर्तन संस्था, पर्यावरण संवर्धन समिती, ज्येष्ठ नागरिक संघ, अलाइव्ह संस्था, पर्यावरण गतीविधी संस्था, वैष्णवी फाउंडेशन आदी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. विविध स्वयंसेवी संस्थांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी विविध नावीन्यपूर्ण संकल्पना मांडल्या. विविध स्वयंसेवी संस्थांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी विविध नावीन्यपूर्ण संकल्पना मांडल्या. गणेशमूर्ती विसर्जनानंतर शाडू व इतर मातीचा पुनर्वापर, मूर्ती संकलन, निर्माल्य संकलन, नैसर्गिक मातीचा वापर करून गणेश मूर्ती बनवणे, अशा संकल्पनांचा त्यात समावेश होता.

अधिकारी म्हणतात...
आयुक्त सिंह म्हणाले, ‘‘गणेशोत्सवाची परंपरा आणि संस्कृतीला अनुरूप राहून, पर्यावरणाची संकल्पना राबवणे सहज शक्य आहे. यासाठी गणेशभक्तांच्या भावनेचा आदर करून त्यांना पर्यावरणपूरक गणेशोत्सवात सहभागी करून घेतले पाहिजे. महापालिकेतर्फे मूर्ती विसर्जनासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मूर्ती संकलनाची व्यवस्था घाटांवर आणि फिरत्या मूर्ती संकलन रथांवर केली आहे. गणेश विसर्जनावेळी पर्यावरण प्रेमी संस्थांच्या स्वयंसेवकांनी संरचनात्मक नियोजनावर भर देऊन प्रशासकीय यंत्रणांशी समन्वय ठेवावा.’’
पोलिस उपायुक्त इप्पर म्हणाले, ‘‘गणेशभक्तांच्या भावना न दुखावता पर्यावरणप्रेमी स्वयंसेवकांनी गणेशोत्सवामध्ये कार्य करावे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव आनंदपूर्ण व शांततापूर्व वातावरणात साजरा करावा. पोलिस प्रशासनाला स्वयंसेवी संस्था व नागरिकांनी सहकार्य करावे.’’

स्वयंसेवी संस्थांच्या अपेक्षा
- नागरिकांनी शाडूच्या मूर्तींचे घरीच विसर्जन करून माती स्वयंसेवी संस्थांकडे द्यावी
- विसर्जन घाटांवर मूर्ती व निर्माल्यदान करून शून्य कचरा उपक्रम राबवावा
- ग्रीन गणेशोत्सव संकल्पना राबवून नैसर्गिक मातीच्या मूर्तींचा वापर करावा
- निर्माल्य कुंड केवळ गणेशोत्सवापुरतेच मर्यादित न ठेवता कायमस्वरूपी ठेवावेत
- प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करून पर्यावरण संवर्धन करावे

घरगुती गणपतींबाबत सूचना
- नागरिकांनी शाडूमाती, तुरटी किंवा कागदी लगद्यापासून बनविलेल्या पर्यावरणपूरक अर्थात विघटनशील मूर्तींना प्राधान्य द्यावे
- धातू, लाकूड, दगड यापासून बनविलेल्या पुनर्वापर करता येणाऱ्या मूर्ती वापराव्यात
- शाडूची किंवा पर्यावरणपूरक मूर्तींचे विसर्जन घरीच करून किंवा कृत्रिम हौदात विसर्जन करून गर्दी टाळावी
- शक्यतो प्लास्टर ऑफ पॅरीसच्या (पीओपी) मूर्ती वापरू नयेत, वापरल्यास त्यांच्या खाली लाल मार्किंग करावी
- आराससाठी प्लास्टिक, थर्माकोल व पर्यावरणास हानिकारक वस्तूंचा वापर करू नये.

गणेश मंडळांसाठी सूचना
- वर्गणी किंवा देणगी स्वेच्छेने स्वीकारावी, जबरदस्ती करू नये, गर्दी न होण्याची काळजी घ्यावी
- आरोग्य विषयक उपक्रम किंवा रक्तदानासारखी शिबिरे घ्यावीत, स्वच्छतेबाबत जनजागृती करावी
- आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम करताना
ध्वनीक्षेपकांचा आवाज कमी ठेवून ध्वनी प्रदूषणाबाबतचे नियम पाळावेत
- गर्दी टाळण्यासाठी मंडळांनी श्रीगणेशाचे आरती व दर्शनाची सुविधा ऑनलाइन, केबल नेटवर्क, वेबसाइट व फेसबुकव्दारे द्यावी
- मंडपामध्ये निर्जंतुकीकर व थर्मल स्क्रीनिंगची व्यवस्था करावी, भाविकांसाठी शारीरिक अंतर, मास्क, सॅनिटायझरची व्यवस्था करावी

पर्यावरणप्रेमींच्या कथनी-करणीत फरक
गणेशोत्साव नियोजनासाठी आयोजित बैठक पर्यावरणप्रेमींनी पर्यावरण संवर्धनासाठी प्लास्टिकमुक्तीबाबत सूचना मांडल्या. मात्र, यातील एका संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी बैठकीच्या उत्तरार्धात नवनियुक्त आयुक्तांचा सत्कार केला. मात्र, त्यांनी आणलेला पुष्पगुच्छ प्लास्टिक कागदाच्या वेष्टनात होता. ही बाब लक्षात येताच आयुक्त शेखर सिंह यांनी पुष्पगुच्छ स्वीकारण्यास नकार दिला. मात्र, पोलिस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार त्या गुच्छातील गुलाबाची दोन फुले काढून आयुक्तांचा सत्कार केला. त्यावरून संबंधित पर्यावरणप्रेमींच्या कथनी व करणीत फरक असल्याची गुजबूज उपस्थितांत रंगली.

---

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d93611 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..