पिंपरी चिंचवडकांना गणेशोत्सवाचे वेध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी चिंचवडकांना गणेशोत्सवाचे वेध
पिंपरी चिंचवडकांना गणेशोत्सवाचे वेध

पिंपरी चिंचवडकांना गणेशोत्सवाचे वेध

sakal_logo
By

पिंपरी, ता. २७ : गेले दोन वर्षे कोरोनाच्या सावटाखाली गेल्यानंतर गणेश आगमनाच्या वातावरणाने शहर परिसर चैतन्यमयी झाले आहे. भाविकांच्या मनावरील मरगळ दूर झाली आहे. गणेशोत्सव मंडळे उत्सवाच्या जोरदार तयारीला लागले असून मंडप, कमानींच्या उभारणीला वेग आला आहे. गणेशोत्सवाची चाहूल पिंपरी-चिंचवडकरांना लागली आहे. बाजारपेठेतही किरकोळ, ठोक विक्रेत्यांकडून सजावट साहित्य विक्री जोमाने सुरू आहे. घरगुती गणरायाच्या आगमनाची तयारी घरोघरी सुरू झाल्याने मूर्तींचे बुकिंगही ७५ टक्क्यांहून अधिक झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
शहरात शेकडो गणेश मंडळानी गणेशोत्सवाच्या आगमनासाठी हटके स्टाइल सजावटीसाठी बाजारपेठ गाठली आहे. त्यातही पर्यावरणपूरक साहित्याला सर्वाधिक मागणी आहे. मंडप उभारणीसाठी लागणारे बांबू, सुतळी, विविधरंगी मंडप, कमान यांना प्रचंड मागणी वाढली आहे. प्रतीसाहित्य दहा ते पंधरा टक्क्यांनी दरामध्ये वाढ झाली आहे. दरवर्षीच्या तुलनेत मोठ्या मंडळाच्या देणग्या कमी जमा झालेल्या आहेत. मात्र, दरवर्षीच्या देणगीदारांनी देणगी देणे सोडले नसल्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. दरवर्षीच्या तुलनेत होणारे मोठे कार्यक्रम, हलते व जिवंत देखावे, तसेच मंडळापुढे दहा दिवस होणारे विविध सामाजिक उपक्रम यांच्या खर्चांचा ताळमेळ यावर्षी घालविणे अवघड झाले आहे. मात्र, मंडळांच्या उत्साहाला सीमा नाही. त्याच जोशाने गणेश मंडळे तयारीला लागले आहेत.

सजावटीच्या साहित्यामध्ये कागदाचे व कापडी मखर हे दोनशे रुपयांपासून ते चार हजार रुपयांपर्यंत आहेत. विविध रंगसंगती, चकचकीत असलेल्या काचेच्या व कापडी तसेच, कागदी लटकन, विविधरंगी बेरंगी व आकर्षक हार, विविधरंगी आर्टिफिशिअल फुले, विद्युत रोषणाई माळा, मूषक, विविध कटआऊट, झिरमिळ्या यांना सर्वाधिक मागणी आहे. त्यातही याच्या किमती दहा टक्क्यांनी वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. सर्वांत आनंदाची बाब म्हणजे, गणपती बाप्पाचे बुकिंग जोरदार झाले आहे. घरगुती दोन फुटापर्यंतच्या मूर्तीचे बुकिंग सर्वाधिक आहे. शाडू मूर्तीची सर्वाधिक विक्री झाली आहे. शास्त्रशुद्ध म्हणजेच मूळ रूपातील मूर्तींना सर्वाधिक मागणी आहे. या वर्षी सोशल मीडियावरील संदेश व जनजागृतीमुळे प्रतीकात्मक रूपातील मूर्तींना मागणी घटली आहे. प्लास्टिक सजावट साहित्य, थर्माकोल, चायना मटेरिअलला बंदी असल्याने बाजारात मागणी कमी आहे. पर्यावरणपूरक सजावटीच्या साहित्याला सर्वाधिक मागणी आहे. तसेच, पूजा साहित्यांच्या दुकानातही विविध साहित्य खरेदीसाठी मागणी वाढली आहे. शनिवार व रविवार जोडून सुट्ट्या आल्याने पिंपरी कॅम्प, चिंचवड बाजारपेठेत गर्दी पहावयास मिळाली.

विविध रूपांत गणेशमूर्ती
कल्याण, पेण, मुंबई, पुणे, गुजरात यासह ग्रामीण भागातून गणेशमूर्ती शहरात दाखल झाल्या आहेत. ५१ रुपयांपासून ग्राहकाच्या आर्थिक क्षमतेनुसार विविध पर्याय उपलब्ध आहेत. सिद्धिविनायक, दागिना गणपती, पेशवे बैठक, सावकार बैठक, दगडूशेठ आदी रूपांत मूर्ती आहेत. त्यात दागिना, दगडूशेठ हलवाई आणि बाल गणेश या मूर्तीला विशेष मागणी आहे. विविध कार्टून्स, मराठी मालिकांच्या व चित्रपटांच्या प्रतिकृतीवर आधारित गणेशमूर्ती बाजारातून हद्दपार झाल्या आहेत. मूर्ती सजावटीत कलाकारांनी आकर्षकता आणली आहे. विद्युत रोषणाईत थ्रीडी इफेक्ट दाखविणारे रंगीत तलम कपड्यांवरील चमकीचे सोहळे मूर्तीना परिधान करण्यात आले आहे. आकर्षक डायमंड म्हणजेच खडे असलेल्या चकचकीत मूर्ती लक्ष वेधून घेत असल्याचे विक्रेते अनिल लांडगे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22d94307 Txt Pc Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..